बातमी ऐका (Marathi Voice Reader)
छत्रपती संभाजीनगर : लग्नाला अवघे काही महिने झाले असताना चारचाकी खरेदीसाठी माहेरून पाच लाख रुपये आणण्याचा तगादा, सोन्याच्या चैनवरून टोमणे आणि मारहाण… अशा छळाला सामोरे जावे लागल्याचा आरोप एका 25 वर्षीय विवाहितेने केला आहे. गर्भवती असताना उपचारांसाठीही सहकार्य केले नसल्याचा आरोप असून, तिचा गर्भपात झाला. या प्रकरणी छावणी पोलिसांनी पती, सासू-सासरे आणि अन्य दोन नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात पती सुमित अशोक मगरे (वय 32, व्यवसाय शिक्षक, शिक्षण एमएससी, बी.एड.), सासू विजया अशोक मगरे, सासरे अशोक मगरे, नणंद अश्विनी अजय बनसोडे आणि मोठा दीर प्रशांत मगरे (सर्व रा. प्लॉट क्रमांक 9, चांदमारी रिक्षा स्टँडजवळ, न्यू नंदनवन कॉलनी, भुजबळ नगर, छत्रपती संभाजीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, 25 वर्षीय पीडितेचा सुमित मगरे याच्याशी 5 एप्रिल 2026 रोजी छत्रपती संभाजीनगरजवळील सावंगी येथील एका लॉनमध्ये दोन्ही कुटुंबांच्या संमतीने विवाह झाला. लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. मात्र, लग्नानंतर अवघ्या चार ते पाच दिवसांतच सासरच्या मंडळींकडून त्रास देण्यास सुरुवात झाल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
बंटी दीक्षित हत्या प्रकरणाचा व्हिडीओ आला समोर, स्कुटरला धडक दिली आणि…
लग्नात मुलीच्या वडिलांनी नवरदेवाला सोन्याची चैन दिली नाही, या कारणावरून पती सुमित, सासू विजया, सासरे अशोक आणि इतर नातेवाइकांनी टोमणे मारण्यास सुरुवात केली. त्यातून पीडितेला मानसिक त्रास दिला जात असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संसार टिकून राहावा, या हेतूने पीडितेच्या वडिलांनी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात सासरी जाऊन जावयाच्या गळ्यात सोन्याची चैन घातली. मात्र, त्यानंतरही सासरच्या मंडळींच्या मागण्या थांबल्या नाहीत.
14 जून 2026 रोजी पीडितेला शिवीगाळ करून चारचाकी खरेदीसाठी माहेरून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात आली. दिलेली सोन्याची चैन अपुरी असल्याचे सांगत, पैसे आणले नाहीत तर सुमितचे दुसरे लग्न लावून देऊ आणि घरातून बाहेर काढू, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. यावेळी सासू, नणंद आणि दीर यांनी पीडितेला हाताने मारहाण केली, तसेच तिचे केस पकडून खाली पाडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पीडितेचे वजन जास्त असल्याचे कारण देऊन तिला घरातील फरशी पुसणे, झाडलोट करणे आणि दगडावर कपडे धुणे यांसारखी कष्टाची कामे करण्यास भाग पाडले जात होते. तसेच तिला जाणीवपूर्वक कमी जेवण दिले जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
सततच्या शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे पीडितेची प्रकृती खालावली. ती गर्भवती असतानाही सासरच्या मंडळींनी तिला उपचारासाठी किंवा सोनोग्राफीसाठी नेण्यास जाणीवपूर्वक नकार दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या काळात झालेल्या त्रासानंतर 23 ऑगस्ट 2026 रोजी तिचा गर्भपात झाला. त्यानंतर शहरातील एका खासगी रुग्णालयात पीडितेवर उपचार करण्यात आले. डॉक्टरांनी तिला तीव्र मानसिक आणि शारीरिक त्रासामुळे ‘ब्रेन स्ट्रोक’ आल्याचे निदान केल्याचा उल्लेख फिर्यादीत आहे. वेळेत गर्भपात केला नसता तर तिच्या जीवाला धोका निर्माण झाला असता, असे डॉक्टरांनी सांगितल्याचेही पीडितेने फिर्यादीत नमूद केले आहे.
गर्भपातानंतर सासरच्या मंडळींनी पीडितेला पुन्हा नांदवून घेण्यास नकार दिला. तिच्या माहेरच्या मंडळींनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून छावणी पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.