बातमी ऐका (Marathi Voice Reader)
Indapur Crime News : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं चित्र पहायला मिळतंय. अशातच उजनी धरणाच्या पाण्याच्या पात्रात एका 26 वर्षीय विवाहितेचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. न्यायालयाने सुरू असलेला बलात्काराचा जुना खटला मागे घेण्यासाठी आरोपीकडून सातत्याने दबाव टाकला जात होता आणि नकार दिल्यानेच हा थरारक खून केल्याचे तपासात उघड झाले आहे. करमाळा पोलिसांनी या गुन्ह्याचा अवघ्या दोन तासांत छडा लावत संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पण नेमकं काय काय घडलं होतं?
धमकी देऊन अत्याचार केला अन्…
26 वर्षाच्या मृत महिलेची ओळख कीर्ती रामचंद्र डाबरे अशी पटली आहे, तर भगवान महादेव कांबळे नावाच्या 51 वर्षाच्या आरोपीला अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी भगवान कांबळे याने यापूर्वी कीर्तीच्या मुलाला मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला होता. याप्रकरणी कीर्तीने करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता आणि सध्या न्यायालयामध्ये हा खटला सुरू होता.
दोन महिन्यांपूर्वी काय घडलं होतं?
जामिनावरील बाहेर आल्यानंतर आरोपी भगवान कांबळे हा खटला मागे घेण्यासाठी कीर्तीवर सतत दबाव टाकत होता. खटला मागे घेतला नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही तो देत असल्याचे कीर्तीने तिच्या आईला सांगितले होते. इतकेच नव्हे तर, 19 ऑगस्ट 2026 रोजी देखील धमकावल्याची तक्रार कीर्तीने इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल केली होती, तसेच दोन महिन्यांपूर्वी टेंभुर्णी येथे ती गेली असताना संशयावरून कांबळे याने तिला मारहाणही केली होती, असे तिच्या आईने जबाबात म्हटले आहे.
तिला समजवून सांगा, नायतर…
3 नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आरोपीने कीर्तीच्या आईला फोन करून, "तुमची मुलगी माझ्या घराजवळ फिरत आहे, तिला समजवून सांगा, नायतर तिचे काय करायचे ते मी बघतो," अशी थेट धमकी दिली होती. याच वादातून आणि खटला मागे घेत नसल्याच्या रागातून आरोपीने ओढणीने गळा आवळून कीर्तीचा खून केला. यानंतर तिचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून बिटरगाव (वांगी) परिसरातील उजनी धरणाच्या पाण्यात फेकून दिला.
दोन तासांत संशयित आरोपीला अटक
गुरुवारी, 5 नोव्हेंबर रोजी उजनी धरणाच्या पाण्यात हा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला असल्याने ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, पोलिसांनी कसून तपास करत 7 नोव्हेंबर रोजी मृत महिलेची ओळख पटवली. याप्रकरणी मृताची आई रुपाली सुखदेव चांदणे यांनी करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या दोन तासांत संशयित आरोपीला अटक केली आहे.