बातमी ऐका (Marathi Voice Reader)
सोलापूर : "लग्न जुळवून देतो…" हे दोन शब्द कोणत्याही अविवाहित तरुणाच्या आयुष्यात नवीन स्वप्नांची पहाट घेऊन येतात. मात्र, सोलापूरमधील सूरज पवार यांच्यासाठी हेच शब्द एका वाईट स्वप्नाची सुरुवात ठरले. लग्नाचे आमिष दाखवून तरुणाची आर्थिक फसवणूक करणे, खोटे लग्न लावून घरात सोन्या-नाण्यांवर डल्ला मारणे आणि त्यानंतर पोबारा करणे, असा अत्यंत चलाख कट रचणाऱ्या एका आंतरजिल्हा बोगस मॅट्रिमोनी रॅकेटचा विजापूर नाका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या थरारक कारवाईत पुणे, जालना आणि सोलापूर जिल्ह्यातून आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.
सूरज संजय पवार (वय 31) हे आपल्या संसाराची स्वप्ने पाहत असताना त्यांच्या आयुष्यात एजंट लोकांचा प्रवेश झाला. एजंट ज्योती धनंजय लोंढे आणि सचिन शिंदे यांनी सूरज यांना हेारले. त्यांच्याशी गोड बोलून विश्वास संपादन केला आणि योगिता दत्तात्रय सूर्यवंशी या तरुणीशी लग्न लावून देण्याचे ठरवले. या टोळीने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने सूरज यांच्याकडून एजंट फी आणि लग्नाच्या खर्चाच्या नावाखाली वेळोवेळी तब्बल 2 लाख 17 हजार रुपये उकळले. 18 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2026 या अवघ्या काही दिवसांत हा सगळा खेळ रचला गेला. शेवटी ठरल्याप्रमाणे एका मंदिरात किंवा साध्या पद्धतीने योगिता हिच्यासोबत सूरज यांचे लग्न लावून देण्यात आले. तरुण अत्यंत आनंदाने आपल्या नवीन संसाराची सुरुवात करण्यासाठी नवरीला घेऊन घरी आला.
नवरी घरी आल्यावर सूरज आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आनंद झाला होता. मात्र, योगिताच्या मनात काहीतरी वेगळेच चालले होते. ती घरात राहत असली, तरी तिची वागणूक संशयास्पद होती. घरी आल्यावर तिने सूरज यांना जवळ येऊ दिले नाही. मला मासिक पाळी आली आहे आणि घरात धार्मिक कार्यक्रम झाल्याशिवाय आपण शारीरिक संबंध ठेवायचे नाहीत, अशी बतावणी करत तिने सूरजला दररोज वेगवेगळी कारणे देऊन दूर ठेवले. बिचारा सूरज तिच्या या बोलण्यावर विश्वास ठेवून होता, त्याला काय माहीत नव्हते की हा सगळा एका मोठ्या फसवणुकीचा भाग आहे.
काही दिवसांनी सूरज हे त्यांच्या बहिणीला सोडण्यासाठी पंढरपूरला गेले. घरात कोणी नाही, हीच योग्य वेळ साधून बोगस नवरी योगिताने आपला खरा चेहरा दाखवला. तिने घरातून कपाटात ठेवलेले 1 लाख रुपये रोख आणि सूरजने लग्नात केलेले तसेच त्याच्या आईचे मिळून दीड तोळे वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन घर सोडले आणि क्षणात गायब झाली. सूरज जेव्हा परत आले, तेव्हा घर रिकामे पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपल्यासोबत फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
याप्रकरणी सूरज पवार यांनी तात्काळ विजापूर नाका पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी ज्योती धनंजय लोंढे (एजंट), सचिन शिंदे (एजंट), योगिता दत्तात्रय सूर्यवंशी (बोगस नवरी), सुनीता सुनील दाभाडे, दत्तात्रय सूर्यवंशी, कैलास शिंदे यांच्या गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवली. विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुशांत वराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष काजळे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाचा वापर करत तपासाची दिशा ठरवली.
पोलिसांनी एकूण 4 वेगवेगळी पथके तयार केली. या पथकांनी अत्यंत चलाखीने आणि वेगाने चक्रे फिरवत पुणे, जालना आणि सोलापूर जिल्ह्यातून या रॅकेटमधील मुख्य सूत्रधारांसह आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यातील काही मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. तर विजापूर नाका पोलीस या रॅकेटने आणखी किती तरुणांना अशाच प्रकारे गंडा घातला आहे, याचा अधिक तपास करत आहेत.