बातमी ऐका (Marathi Voice Reader)
छत्रपती संभाजीनगर : शेती म्हटलं की पारंपरिक पिकेच घेतली जातात. मात्र, फुलंब्री तालुक्यातील तळेगाव येथील कृष्णा फडके यांनी पारंपरिक पिकांपेक्षा वेगळा प्रयोग करत करटुले या रानभाजीची लागवड केली आहे. बी.एस्सी.पर्यंत शिक्षण घेतलेल्या फडके यांनी डोंगरदऱ्यांमध्ये नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या या रानभाजीचे महत्त्व ओळखून तिची व्यावसायिक शेती सुरू केली. विशेष म्हणजे, अवघ्या चार ते पाच महिन्यांच्या या पिकातून आतापर्यंत सुमारे साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, आणखी जवळपास दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.
करटुले ही रानभाजी प्रामुख्याने पावसाळ्यात डोंगरदऱ्या, माळरान तसेच शेताच्या बांधावर नैसर्गिकरीत्या उगवते. ग्रामीण भागात या भाजीची मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र, तिची व्यावसायिक पद्धतीने लागवड करण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. ही बाब लक्षात घेऊन फडके यांनी करटुल्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीला नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणाऱ्या कर्टुल्याच्या बियाण्यांपासून रोपे तयार करण्यात आली. त्यानंतर शेतात त्याची लागवड करून उत्पादन घेण्यास सुरुवात केली. साधारण चार ते पाच महिन्यांत पीक तयार होत असल्याने कमी कालावधीत उत्पादन मिळते. करटुल्याला बाजारात चांगला दर मिळत असल्याने या प्रयोगातून फडके यांना चांगला आर्थिक फायदा झाला आहे.
करटुल्याची विक्री स्थानिक बाजारपेठेसह छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि मुंबईसारख्या शहरांमध्येही केली जाते. मागणी चांगली असल्याने उत्पादित मालाला बाजारपेठ मिळवणे तुलनेने सोपे जात आहे. त्यामुळे पारंपरिक पिकांसोबत कमी कालावधीतील अशा वेगळ्या पिकांचा पर्यायही शेतकऱ्यांसमोर उपलब्ध होऊ शकतो.
पारंपरिक पिकांसोबत अशा रानभाज्यांची लागवडही करता येते, हे त्यांनी दाखवून दिलं आहे. करटुल्याची शेती करून फडके यांनी वेगळा प्रयोग यशस्वी केला असून, त्यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.