बातमी ऐका (Marathi Voice Reader)
हैदर शेख, प्रतिनिधी, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरातील अत्यंत थरारक आणि श्वास रोखून धरायला लावणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रकल्पातील पद्मापूर ते मोहरली या रस्त्यावरील कालापाणी भागात एक दुचाकीस्वार आणि वाघ अगदी समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाले.
नेमका प्रकार काय घडला?
एक दुचाकीस्वार पद्मापूर येथून मोहरलीच्या दिशेने प्रवास करत होता. कालापाणी परिसरात पोहोचल्यावर अचानक रस्त्यावर एक वाघ बसलेला असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. वाघ आणि दुचाकीस्वार यांच्यात अत्यंत कमी अंतर असल्याने, कोणतीही घाई किंवा हालचाल करणे दुचाकीस्वारासाठी धोकादायक ठरू शकले असते. त्यामुळे वाघ अगदी जवळ आल्यानंतर दुचाकीस्वार पूर्णपणे स्तब्ध होऊन जागेवरच थांबला.
तीन मिनिटांचा थरार मोबाईलमध्ये कैद
वाघ दुचाकीस्वाराकडे आणि दुचाकीस्वार वाघाकडे पाहत असल्याचे या दृश्यात दिसून येते. दोन ते तीन मिनिटांचा हा थरारक व्हिडीओ आहे. समोरून येणाऱ्या एका बसमधील प्रवाशाने हा संपूर्ण प्रसंग आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात शूट केला. सुदैवाने, काही वेळाने वाघ शांतपणे उठला आणि जंगलात निघून गेला. वाघ जंगलात गेल्यावर दुचाकीस्वारासह बसमधील प्रवाशांनीही सुटकेचा निःश्वास सोडला.
वन विभागाकडून चौकशी सुरू
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर व्याघ्र प्रकल्प परिसरातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेतील दुचाकीस्वार नेमका कोण आहे, तसेच या संपूर्ण प्रकारात नियमभंग किंवा चूक कोणाची झाली, याचा शोध घेण्यासाठी वन विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.