बातमी ऐका (Marathi Voice Reader)
सोलापूर – चालत्या रेल्वेत प्रवाशांना लुटणाऱ्या महिलेला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली. सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी एका महिलेचे दागिने चोरल्याच्या प्रकरणात ही कारवाई केली. धक्कादायक बाब म्हणजे प्रवाशांना प्रसाद म्हणून गुंगी आणणारे घटक असणारी चिक्की द्यायची आणि बेशुद्ध झाल्यानंतर दागिने व इतर ऐवज घेऊन पसार व्हायची. गीतादेवी उर्फ मीनादेवी रामनरेश थोरे (वय ५९, रा. कटरा, जि. इटावा, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. या कारवाईनंतर लुटीचे अनेक प्रकार समोर आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद व्यंकोबा कुमरा (वय ३१, रा. आंध्र प्रदेश) हे आपल्या पत्नी संध्या यांच्यासह १५ सप्टेंबर २०२६ रोजी कर्नाटक सुपरफास्ट एक्सप्रेसच्या जनरल बोगीतून कोपरगाव ते मंत्रालय असा प्रवास करत होते. गाडी सोलापूर रेल्वे स्थानकाकडे येत असताना एका अज्ञात ६० वर्षीय महिलेने दोघांना प्रसाद म्हणून चिक्की खायला दिली. ती खाल्ल्यानंतर फिर्यादी व त्यांच्या पत्नीला गुंगी आली. याचा फायदा घेत आरोपी महिलेने अंदाजे ५० ग्रॅम वजनाचे, १ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. याप्रकरणी २९ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Pune News: आधी वडिलांचं निधन; आता शिक्षिका आईचाही पुण्यात रस्त्यातच निर्घृण खून, वाढदिवसादिवशीच लेक झाली पोरकी
तपासादरम्यान आरपीएफ सोलापूरकडून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फिर्यादींनी आरोपीची ओळख पटवली. गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात सापळा रचून तिला ताब्यात घेतले. चौकशीत तिने चोरीचे दागिने मुंबई व उत्तर प्रदेश येथे विकल्याचे सांगितले. तिच्यावर विविध रेल्वे पोलीस ठाण्यांत यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असून, मुद्देमाल हस्तगत करणे व साथीदारांचा शोध घेण्यासाठी तिला १० दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली आहे.