बातमी ऐका (Marathi Voice Reader)
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत 16,717 पदांच्या भरती प्रक्रियेमुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मोठ्या प्रमाणावर पदभरती होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात केली आहे. मात्र, अभ्यास करताना केवळ पुस्तकांचे वाचन, नोट्स तयार करणे किंवा प्रश्नांचा सराव यावर भर न देता योग्य नियोजन आणि अभ्यासाची दिशा ठरवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. परीक्षेच्या तयारीत काही चुका टाळल्यास विद्यार्थ्यांना अधिक प्रभावीपणे अभ्यास करता येऊ शकतो. याबद्दलच विद्यार्थी आणि क्लास प्रशिक्षक संदीप जाधव यांनी माहिती दिली आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. कोणता विषय किती वेळ अभ्यासायचा, कोणत्या विषयाला अधिक प्राधान्य द्यायचे आणि अभ्यासक्रम किती दिवसांत पूर्ण करायचा, याचे नियोजन असावे. अभ्यास करताना सातत्य ठेवणे महत्त्वाचे असून, एकाच वेळी अनेक विषयांचा अभ्यास करण्यापेक्षा ठरवून विषयवार अभ्यास केल्यास संकल्पना अधिक स्पष्ट होतात.
अनेक विद्यार्थी पुस्तकांचे वाचन आणि संकल्पना समजून घेण्यावर अधिक भर देतात. मात्र प्रत्यक्ष प्रश्न सोडवण्याचा पुरेसा सराव करत नाहीत. त्यामुळे परीक्षेत प्रश्न समोर आल्यानंतर त्याचे उत्तर शोधताना अडचणी येऊ शकतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत नियमित प्रश्न सोडवणे, सराव परीक्षा देणे आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. यामुळे प्रश्न समजून घेण्याची क्षमता, वेळेचे नियोजन आणि उत्तर निवडण्याचा आत्मविश्वास वाढतो.
परीक्षेची तयारी करताना प्रत्येक प्रश्नाचा नेमका अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे. प्रश्नातील शब्दरचना, पर्याय आणि त्यामागील संकल्पना यांचा विचार करणे आवश्यक आहे. केवळ पाठांतरावर आधारित अभ्यास न करता विषय समजून घेतल्यास वेगळ्या पद्धतीने विचारलेले प्रश्नही सोडवता येतात. विद्यार्थ्यांनी प्रश्न वाचताना त्यातील महत्त्वाचे मुद्दे ओळखण्याची आणि चुकीचे पर्याय बाद करण्याची सवय लावावी.
पूर्व परीक्षेत नकारात्मक गुणांकन असल्याने विद्यार्थ्यांनी अंदाजाने प्रश्न सोडवण्याची सवय टाळावी. विशेषतः ज्या प्रश्नांची उत्तरे माहीत नाहीत, त्यावर विनाकारण पर्याय निवडण्याऐवजी प्रश्नाचे स्वरूप समजून निर्णय घ्यावा. नकारात्मक गुणांकनाचा परिणाम लक्षात घेऊन प्रश्न सोडवण्याची रणनीती तयार करणे आवश्यक आहे. यामुळे मिळवलेले गुण टिकवण्यास मदत होऊ शकते.
परीक्षेच्या काळात कटऑफ किती लागेल, कोणत्या विषयातून किती प्रश्न येतील किंवा पेपर सोपा की कठीण असेल, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये चर्चा होत असते. मात्र, अशा चर्चांमुळे अभ्यासावर परिणाम होऊ शकतो. कटऑफचा अंदाज बांधण्यापेक्षा स्वतःची तयारी मजबूत करणे, अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि नियमित सराव करणे यावर विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करावे, अशी माहिती संदीप जाधव यांनी दिली.
दीर्घकाळ केवळ वाचन करत राहिल्याने प्रश्न सोडवण्याची क्षमता विकसित होईलच असे नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाचन, उजळणी, सराव प्रश्न, मॉक टेस्ट आणि चुका तपासणे या सर्वांचा अभ्यासात समावेश करावा. नियमित अभ्यास, योग्य वेळेचे नियोजन आणि आत्मविश्वास या गोष्टी परीक्षेच्या तयारीत महत्त्वाची भूमिका बजावतात.
एकूणच, मोठ्या पदभरतीच्या संधीचा विचार करून विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना गोंधळ न करता योग्य रणनीती आखावी. सातत्यपूर्ण प्रयत्न, अभ्यासाचे नियोजन आणि प्रश्न सोडवण्याचा नियमित सराव याच्या माध्यमातून परीक्षेची तयारी अधिक प्रभावी करता येईल.