बातमी ऐका (Marathi Voice Reader)
सोलापूर: सोलापूर शहरातील जोडभावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला कोर्टानं मोठी शिक्षा सुनावली आहे. आरोपीनं पीडितेला लग्नाचं आमिष दाखवून पळवून नेलं होतं. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणी आरोपी तरुणाला सोलापूरच्या विशेष न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
विजय हनुमंत उर्फ हणमंतराव पुजारी (वय ३२) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सोलापूरचे विशेष न्यायाधीश अजितकुमार भस्मे यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला असून, आरोपीला सक्तमजुरीसह ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, २७ नोव्हेंबर २०१८ रोजी आरोपी विजय पुजारी याने अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून पळवून नेलं होते. या घटनेनंतर पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोलापुरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता, आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यानुसार पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई करत आरोपपत्र दाखल केले होते.
१४ साक्षीदारांच्या साक्षी आणि न्यायालयाचा निकाल
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षाकडून एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षी, उपलब्ध पुरावे आणि सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत विशेष न्यायाधीश अजितकुमार भस्मे यांनी आरोपीला दोषी ठरवले. न्यायालयाने आरोपी विजय पुजारी याला १० वर्षे सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.