बातमी ऐका (Marathi Voice Reader)
पुणे : पुणेकरांना पुन्हा एकदा सावध करणारी एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवून त्याला थेट घरात प्रवेश देणं किती घातक ठरू शकतं, याचाच प्रत्यय देणारी ही घटना आहे. यात एक साधारण 30 ते 35 वर्ष वय असलेली एक महिला दरवाजावर आली. घरात ज्येष्ठ महिला एकटीच राहायची. हिच संधी त्या तरुण महिलेनं साधली. ती आधी लाडकी बहीण योजनेची माहिती देण्याच्या बहाण्यानं घरी गेली. मग ज्येष्ठ महिलेची मालिष करून देण्याच्या बहाण्यानं घरात प्रवेश मिळवला आणि पुढे घडलं कांड. महिलेनं उशीखाली ठेवलेली सोन्याची माळच गायब झाली. ही घटना लष्कर परिसरातील न्यू मोदी खाना येथे घडली.
या प्रकरणी ७५ वर्षीय महिलेने लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, ३० ते ३५ वर्षांच्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील तक्रारदार ज्येष्ठ महिला न्यू मोदी खाना येथील गोल हौद परिसरात राहतात. त्या घरात एकट्याच असतात. त्यांचा मुलगा वानवडी परिसरात राहतो. तक्रारदार महिलेला गंभीर आजार आहे. यासाठी नुकतंच त्यांच्यावर ऑपरेशन झालं आहे. शनिवारी नेहमीप्रमाणे त्या आपल्या घरात असताना दुपारी पावणेतीनच्या सुमारास एक तरुण महिला त्यांच्या घरी आली.
‘लाडकी बहीण’ योजनेची माहिती देण्याच्या बहाण्याने ती दरवाजावर आली. त्यानंतर मानेची मालिश केल्यास बरे वाटेल, असे सांगून मालिश करण्याच्या बहाण्याने तिने घरात प्रवेश मिळवला. मग ज्येष्ठ महिलेची मालिश करण्यास सुरुवात केली. मालिश करताना आरोपीने महिलेच्या उशीखाली ठेवलेली सोन्याची माळ हळूच चोरली. त्यानंतर ती तिथून निघून गेली. काही वेळाने सोन्याची माळ चोरीला गेल्याचं ज्येष्ठ महिलेच्या लक्षात आलं आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. याप्रकरणी त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी ३० ते ३५ वर्षांच्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.