मारेगाव–करंजी राज्य महामार्गावर भरदुपारी काळाचा घाला; पती-पत्नीच्या प्रवासाचा दुर्दैवी शेवट, परिसरात हळहळ
सुरेश पाचभाई | मारेगाव
मारेगाव तालुक्यातील जळका बसस्टॉप परिसरात कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिचे पती गंभीर जखमी झाले. बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास मारेगाव–करंजी राज्य महामार्गावर ही दुर्घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सविता सिडाम यांचा मृत्यू; पती बंडू सिडाम गंभीर
या अपघातात सविता बंडू सिडाम (वय ४५, रा. वांजरी, ता. वणी, जि. यवतमाळ) यांचा मृत्यू झाला. तर त्यांचे पती बंडू बन्सी सिडाम (वय ५०, रा. वांजरी) हे गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नी दुचाकीने करंजीकडून वांजरीच्या दिशेने प्रवास करीत होते. मात्र, जळका बसस्टॉप परिसरात त्यांच्या प्रवासावर अपघाताने विराम दिला.
दोन्ही वाहनांची जोरदार धडक
प्राथमिक माहितीनुसार, कार मारेगावकडून करंजीच्या दिशेने जात होती, तर दुचाकी करंजीकडून मारेगावच्या दिशेने येत होती. दरम्यान, जळका बसस्टॉप परिसरात दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता मोठी असल्याने दुचाकीवरील सविता सिडाम यांचा मृत्यू झाला, तर बंडू सिडाम गंभीर जखमी झाले.
नागरिकांची धावपळ; जखमी रुग्णालयात दाखल
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. गंभीर जखमी बंडू सिडाम यांना पुढील उपचारासाठी करंजी येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे. मृत सविता सिडाम यांचा मृतदेह मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे समजते.
या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी व पुढील तपासानंतरच अपघातामागील कारणांचा उलगडा होणार आहे
एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळविणाऱ्या या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.