शेकडो वर्षांची परंपरा आजही अखंड; गंगाराम बुवांच्या नामस्मरणाने पहाटे अवघे गाव दुमदुमले, आबालवृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव:चोपण आधुनिकतेच्या वेगवान युगातही गावाचा सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा जपण्याची परंपरा चोपण गावाने आजही कायम ठेवली आहे. शेकडो वर्षांपासून अखंड सुरू असलेली काकड आरतीची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. पहाटेच्या शांत वातावरणात टाळ-मृदंगाचा निनाद, भजन-अभंगांचा गजर आणि गंगाराम बुवांच्या नामस्मरणाने अवघे चोपण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले.
‘चोपण गाव दूरवर नाव, ठिकाण देवाचे गंगाराम बुवाचे’ अशी श्रद्धेने ओळख असलेल्या या गावात आराध्य दैवत गंगाराम बुवांप्रती असलेली भक्ती काकड आरतीच्या माध्यमातून अनुभवायला मिळाली. पहाटेच्या प्रसन्न प्रहरी गावातील भाविक एकत्र येत भजन, अभंग आणि आरतीच्या गजरात संपूर्ण गावातून मार्गक्रमण करतात. पिढ्यान्पिढ्या सुरू असलेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने जोपासली जात आहे.
या धार्मिक सोहळ्यात महिला, पुरुष, तरुणाई तसेच ज्येष्ठ नागरिकांसह आबालवृद्धांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी एकत्र येत भक्तीचा जागर केला. विशेष म्हणजे, बदलत्या काळातही नव्या पिढीचा या परंपरेतील सहभाग गावाच्या सांस्कृतिक वारशाला नवी ऊर्जा देणारा ठरत आहे.
केवळ आरती नव्हे, गावाच्या एकोप्याचे प्रतीक!
चोपणमधील काकड आरती ही केवळ धार्मिक परंपरा नसून गावातील सामाजिक एकोपा, सामूहिक श्रद्धा आणि सांस्कृतिक ऐक्याचे जिवंत प्रतीक बनली आहे. गंगाराम बुवांच्या नामस्मरणातून गावकऱ्यांना मिळणारी आध्यात्मिक ऊर्जा आणि एकत्र येण्याची भावना या उपक्रमातून अधोरेखित झाली.
शेकडो वर्षांचा हा भक्तीचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत असाच अखंड सुरू राहावा, हीच भावना व्यक्त होत असताना गंगाराम बुवांच्या जयघोषाने चोपण गावातील पहाट भक्तिमय झाली. परंपरेचा अभिमान आणि श्रद्धेची ताकद काय असते, याचा प्रत्यय या काकड आरतीतून पुन्हा एकदा आला.