बातमी ऐका (Marathi Voice Reader)
छत्रपती संभाजीनगर: इन्स्टाग्रामवरून मैत्रीचा आग्रह धरत तरुणीला वारंवार मेसेज करणे आणि तिचा पाठलाग करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. सततच्या त्रासाला कंटाळलेल्या 19 वर्षीय तरुणीच्या नातेवाइकांनी संबंधित तरुणाला पकडून सिडको पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील या धक्कादायक प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल शिवाजी मुरमुडे असे संशयित 21 वर्षीय तरुणाचे नाव असून तो हर्सूल सावंगी, मूळ रा. वाकोद, ता. कन्नड येथील रहिवासी आहे. पोलिसांनी त्याच्याकडील दुचाकी आणि मोबाइल जप्त केला आहे. या प्रकरणात बीएससीचे शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. पीडिता कुटुंबासह राहत असून तिची आई भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते.
मुलाची भेट शेवटची ठरली, घराच्या वाटेवर आक्रीत घडलं, वृद्ध दाम्पत्याला काळानं गाठलं, छ. संभाजीनगरच्या घटनेनं हळहळ
फिर्यादीनुसार, 21 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.35 वाजता पीडिता घरी असताना विशालने इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिला मेसेज केला. ओळख विचारल्यानंतर त्याने अंदाजाने मेसेज केल्याचे सांगितले. तरुणीने मैत्री करण्यास स्पष्ट नकार दिला असता, विशालने पुन्हा मैत्री करण्याबाबत विचारणा करत उर्मट भाषेत मेसेज केला. तरुणीने मेसेजला उत्तर देणे बंद केले तरी त्याचे मेसेज रात्री 7.56 वाजेपर्यंत सुरूच होते.
या संवादादरम्यान विशालने तरुणीला खुलताबाद आणि वेरूळ येथे फिरायला जाण्याचा प्रस्ताव दिला. तरुणीने नकार दिल्यानंतर त्याने तिला टीव्ही सेंटर परिसरातील साई मैदानावर भेटण्यासाठी बोलावले. तरुणी तिथे पोहोचल्यानंतर विशालने भेटीचे ठिकाण बदलले आणि एम-2 रोडवरील एका खासगी रुग्णालयाजवळ येण्यास सांगितले.
विशालने सांगितलेल्या ठिकाणी तरुणी पोहोचल्यानंतर त्याने तिला स्वतःच्या दुचाकीवर बसण्यास सांगितले. याचवेळी तरुणीचे मावस आणि आतेभाऊ तिथे आले. तरुणीने त्यांना विशाल हाच इन्स्टाग्रामवरून सतत मेसेज करून त्रास देणारा तरुण असल्याचे सांगितले. त्यानंतर नातेवाइकांनी विशालला त्याच्या दुचाकी आणि मोबाइलसह पकडून सिडको पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार विमल पवार करीत आहेत.