एक सात वर्षांचा मुलगा गाऊ लागला आणि असा गाऊ लागला की तिथे उपस्थित असलेले सगळेच थक्क झाले. या मुलाचे नाव होते शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकली. आपला मुलगा काहीतरी वेगळे गात असून याच्यात गायनाची वेगळी प्रतिभा दडली असल्याचे शिवपुत्रच्या वडिलांच्या लक्षात आले आणि त्यांनी गुरुकल्ल मठाच्या स्वामींना त्याचे गाणे ऐकवण्याचे ठरवले. स्वामींनी चिमुकल्या शिवपुत्राचे गाणे ऐकले आणि म्हटले, “अरे, हा तर साक्षात गंधर्व..” आणि तेव्हापासूनच या मुलाला कुमार गंधर्व अशी उपाधी दिली गेली आणि याच नावाने त्यांनी जगभर आपल्या गायनाने ख्याती कमावली. ‘रागदरबार’च्या आजच्या पहिल्या भागात आपण सुप्रसिद्ध गायक, ज्यांनी भारतीय संगीताला निर्भय-निर्गुण बनवले अशा पंडित कुमार गंधर्वांच्या जीवनाविषयी तसेच त्यांच्या सांगीतिक प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत… एक काळ होता ज्यांच्या आवाजाने अनेकांच्या दिवसाची सुरुवात व्हायची. रेडिओवर सकाळच्या वेळी ‘ऊठी ऊठी गोपाळा’ ही भूपाळी कुमार गंधर्वांच्या आवजात ऐकून सकाळ सुरू व्हायची आणि तो काळच काही और असायचा. या सुमधुर आवाजाने दिवसाची सुरुवात झाली की संपूर्ण दिवस अगदी छान जायचा, असा अनुभव आजही अनेकजण सांगतात. प्रख्यात साहित्यिक व संगीतकार पु. ल. देशपांडे यांनी एका भाषणात कुमार गंधर्वांच्या विषयी बोलताना म्हटले होते की, कुमार गंधर्व यांच्या गायनाविषयी बोलताना असे म्हटले जाते की ज्यांचा शास्त्रीय गायनाशी किंवा रागदारीशी कसलाही संबंध नाही अशा लोकांनाही त्यांचा आवाज मंत्रमुग्ध करून जातो. त्यांची गायनशैली ही त्यांच्या काळापेक्षाही अनेक वर्ष पुढची होती. पारंपरिक गायन प्रथेसोबतच त्यांनी अनेक गाणाविष्कार केले. ज्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतरही अनेक दशके उलटून गेल्यावरही त्यांच्या गायनाची जादू अजूनही कायम आहे. लहान वयातच मिळाली उपाधी कुमार गंधर्वांचा जन्म 8 एप्रिल 1924 रोजी कर्नाटकच्या बेळगावजवळील सुळेभावी या गावात झाला. त्यांचे मूळ नाव शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकली. त्यांना चार भावंडे होती, यात त्यांचा तिसरा नंबर होता. कुमार गंधर्व यांना त्यांच्या घरातूनच गायनाची आवड लागली असे म्हणता येईल, कारण त्यांचे वडील सिद्धरामय्या गात असत. त्यामुळे घरातील वातावरण सांगितिक होते. लेखाच्या सुरुवातीला जो किस्सा सांगितला होता की, वयाच्या अवघ्या 7 व्या वर्षीच त्यांनी अचानक गायला सुरू केले आणि उपस्थित सर्वच जण थक्क झाले होते. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी गुरुकल्ल मठातील स्वामींसमोर त्यांना गायला लावले आणि स्वामींनी त्यांचे गायन ऐकून त्यांना गंधर्व ही उपाधी दिली. इथूनच पुढे शिवपुत्र कुमार गंधर्व म्हणून ओळखले जाऊ लागले. लहान वयापासून कुमार गंधर्व यांनी गायनाचे कार्यक्रम सुरू केले. तसेच गायनाचे कुठलेही शिक्षण न घेता हा मुलगा इतके छान कसे काय गाऊ शकतो? असा प्रश्न सर्वांना पडायचा. त्याकाळी एखाद्या गाण्याचे सादरीकरण करणे म्हणजे एखादी रेकॉर्ड लावणे आणि त्याच्या पुढे पुढे गाणे सादर करणे. कुमार गंधर्व यांच्यासमोर रेकॉर्ड लावली जायची आणि ते त्याच्यासोबत पुढे गायला लागायचे. त्या गाण्याचा विस्तार देखील ते करायचे. कुमार गंधर्व यांचा हा लौकिक सावंतवाडीच्या महाराजांपर्यंतही पोहोचला. त्यांनी मग एक नवी आलेली रेकॉर्ड कुमार गंधर्व यांच्या समोर लावली आणि रेकॉर्ड सुरू झाली की कुमार गंधर्व त्याच्यासोबत गाऊ लागले, जसे काही त्यांना आपोआपच स्वर समजत होते. त्याकाळात कुमार गंधर्व यांचे कार्यक्रम अगदी लाहोरपर्यंत देखील झाले. देवधरांकडे गिरवले धडे एका मैफिलीत कुमार गंधर्व गात असताना त्यांच्या वडिलांना एकाने सल्ला दिला की या मुलाला मुंबईत प्राध्यापक बी. आर. देवधर यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेण्यासाठी पाठवा. त्यानुसार वडिलांनी कुमार गंधर्व यांना देवधर यांच्या संगीत विद्यालयात आणून सोडले आणि इथून कुमार गंधर्वांच्या सांगीतिक प्रवासाला खरी सुरुवात झाली असे म्हणता येईल. मुंबईच्या गिरगाव येथे ओपेरा हाऊसच्या समोर एका इमारतीच्या तळघरात ‘प्राध्यापक देवधर्स स्कूल ऑफ इंडियन म्युझिक’ आहे. इथेच कुमार गंधर्व यांनी 1936 साली शिक्षणासाठी प्रवेश घेतला. साधारण 12 वर्षे म्हणजे 1947 पर्यंत कुमार गंधर्व यांनी देवधर यांच्या घरी राहूनच संगीताचे धडे गिरवले. इथे शिकण्याचा फायदा असा झाला की देवधर यांच्या या शाळेत देशभरातील नामवंत गायक यायचे. प्राध्यापक देवधर यांचे गुरू पंडित दिगंबर पलुस्कर यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दरवर्षी देशभरातून प्रसिद्ध गायक सादरीकरण करण्यासाठी यायचे. कुमार गंधर्वांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी शाळेत शिकवणे सुरू केले आणि 1947 साली त्यांनी त्यांची विद्यार्थिनी भानुमती कंस यांच्यासोबत प्रेमविवाह केला. कुमार गंधर्वांना आजारपणाने ग्रासले.. कुमार गंधर्व यांना त्या काळी समजला जाणारा असाध्य आजार म्हणजे क्षयरोगाने ग्रासले होते. आजाराचे निदान झाल्यावर डॉक्टरांनी त्यांना अशा ठिकाणी जाऊन राहण्यास सांगितले जिथले वातावरण हे शुष्क, कोरडे असेल. त्यामुळे कुमार गंधर्वांनी मध्य प्रदेशातील देवासची निवड केली. कुमार गंधर्व यांची पत्नी भानुमती यांची बहीण डॉ. त्रिवेणी कंस या देवासला राहत होत्या आणि कुमार गंधर्व यांच्यावर आपल्या मुलाप्रमाणे प्रेम करणारे रामुभैय्या हे देखील देवासला राहत होते. कदाचित त्यामुळेच कुमार गंधर्वांनी देवासला राहण्याचा निर्णय घेतला असावा. ‘कालजयी’ या ग्रंथाच्या सहसंपादक आणि लेखिका रेखा इनामदार-साने यांनी कुमार गंधर्वांच्या आयुष्यातील दोन महत्त्वाच्या पर्वांवर प्रकाश टाकला आहे. त्यांच्या मते, कुमारजींच्या आयुष्यात त्यांच्या दोन्ही पत्नींचे, भानुमती आणि वसुंधराताईंचे स्थान अत्यंत महत्त्वाचे होते. कुमारजींच्या पहिल्या पत्नी, भानुमती या स्वतः एक स्वतंत्र आणि कसदार गायिका होत्या. मात्र, जेव्हा कुमारजींना क्षयरोगाने ग्रासले, तेव्हा भानुमतींनी स्वतःच्या गायकीपेक्षा पतीच्या सेवेला प्राधान्य दिले. त्या काळात त्यांनी केवळ कुमारजींची अहोरात्र सेवाच केली नाही, तर नोकरी करून घराचा आर्थिक डोलाराही सावरला. भानुमतींच्या या निस्सीम सेवेमुळेच कुमारजी त्या आजारातून वाचू शकले, असे मानले जाते. भानुमती आणि कुमारजींना मुकुल शिवपुत्र आणि यशोवर्धन ही दोन मुले झाली. दुर्दैवाने, 1961 मध्ये यशोवर्धनच्या जन्मानंतर भानुमती यांचे निधन झाले. भानुमतींच्या पश्चात, 1962 मध्ये कुमारजींचा विवाह वसुंधराताईंशी झाला. या दोघांना कलापिनी ही मुलगी झाली. 1962 पासून ते 1992 मध्ये कुमारजींचे निधन होईपर्यंत, तब्बल 30 वर्षे वसुंधराताईंनी त्यांना भक्कम साथ दिली. विशेष म्हणजे, त्यांची ही साथ केवळ कौटुंबिक संसारापुरती मर्यादित नव्हती, तर सांगीतिक मैफलींमध्येही त्यांनी कुमारजींना तितक्याच समर्थपणे साथसंगत केली. लोकपरंपरेतून रागांची निर्मिती केली देवास येथे राहत असताना कुमार गंधर्व आजारपणाने चांगलेच त्रस्त होते. त्यांना गाण्याची देखील परवानगी नाकारली होती. जवळपास 5 वर्ष त्यांचे गाणे बंद होते. गाणे बंद असले तरी संगीताचा अभ्यास मात्र त्यांनी कधीच थांबवला नाही. देवास हे मध्य प्रदेशातील माळवा प्रांतातील एक असे गाव आहे जिथे समृद्ध अशी लोकपरंपरा लाभलेली आहे. त्यामुळे कुमार गंधर्व यांच्या कानांवर इथले लोकगीत तसेच लोकसंगीत पडतच होते. माळवा प्रांताचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे इथे फक्त मोठे उत्सवच नाही तर रोजचे छोटे क्षण देखील साजरे केले जायचे आणि या दैनंदिन जीवनातील प्रत्येक विषयासाठी एक गीत आहे. कुमार गंधर्व यांच्या कानांवर ही लोकगीते पडत होती, तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की या गाण्यांचा बाज काहीसा वेगळा आहे. मग त्यांनी या गाण्यांच्या नोंदी करणे सुरू केले व यावर त्यांनी अभ्यास सुरू केला. इथल्या लोकपरंपरेतल्या धुन आणि गीतांचा अभ्यास करत असताना कुमार गंधर्वांनी 11 नवे धुन उगम राग भारतीय संगीताला दिले आणि लोकपरंपरेतूनच रागांची निर्मिती होते हे त्यांनी पहिल्यांदा सिद्ध केले. कुमार गंधर्व यांचे मानणे होते की प्रत्येक रागाची एक धुन असते. अशा लोक धुनींचा अभ्यास त्यांनी केला. ज्या धुनमधून राग तयार झाले नव्हते, त्यांना राग रूप मिळवून दिले. तसेच ज्या रागांची लोकधून सापडत नव्हती, ती त्यांनी शोधून काढली आणि राग संगीत आणखी समृद्ध केले. कुमार गंधर्व यांच्या गायकीविषयी असे सांगितले जाते की त्यांनी प्रत्येक घरण्यातून विशिष्ट गोष्टी आपल्या गायन शैलीत अंगीकारल्या. आग्रा घरण्यातून बोलबनाव अर्थात नादार्थक आघात करण्याची क्षमता घेतली, ग्वाल्हेर घरण्यातून सर्वस्पर्शित्व घेतले आणि या सगळ्यांचा एक गुच्छ तयार केला. परंतु, त्यांची एक अशी ठराविक गायन शैली नव्हती आणि हेच त्यांचे भारतीय शास्त्रीय संगीतातले वेगळेपण मानले जाते. भजन शास्त्रीय संगीताच्या मुख्य प्रवाहात आणले देवास येथे शिलनाथ बाबा नावाचे नाथपंथी संत काही काळासाठी वास्तव्यास होते. त्यांनी पेटवलेली धुनी (पवित्र अग्नी) टेकडीवरच्या मंदिरात आजही तेवत आहे. या ठिकाणी अनेक संत जमा होत. त्यांची भजने देखील वेगळी होती. ते स्वतःसाठी गायचे. याचा देखील प्रभाव कुमार गंधर्व यांच्यावर पडला आणि त्यातूनच त्यांनी कबीर, सूरदास आणि इतर नाथपंथी लोकांची भजने लोकांसमोर आणली. या भजनांचे वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ भक्तीभाव नव्हता तर गुरू शिष्य नात्याला देखील वेगळे स्थान या भजनांमध्ये होते. ‘सुनता है गुरू ग्यानी’, ‘उड जाएगा हंस अकेला’ आणि ‘निर्भय निर्गुण’ अशा कुमारजींनी गायलेल्या रचनांमधून हा विचार आपल्याला प्रकर्षाने दिसून येतो. ‘निर्भय निर्गुण’ ही संत कबीर यांची रचना आहे. निर्भय म्हणजे कुठलीही भीती न बाळगणे, भयमुक्त राहणे आणि निर्गुण म्हणजे सगुण भक्ती न करणे. संत कबीर यांनी मूर्तीपूजा आणि सगुण भक्ती नाकारली होती. कुमार गंधर्व यांनी हाच विचार पुढे नेला. त्यांच्या भाषेत सांगायचे झाले तर, विरानियत आणि फक्कडपण अशी कबिराची दोन वैशिष्ट्ये कुमारजींनी अधोरेखित केली आहेत. विरानियत म्हणजे एकांत, अर्थात एकांतात राहूनच अध्यात्माचा शोध लागू शकतो, असा थोडक्यात विचार कुमार गंधर्वांनी त्यांच्या भजनांमधूनही पुढे आणला. भारतीय शास्त्रीय संगीतातील कुमारजींचे योगदान भारतीय शास्त्रीय संगीतात पंडित कुमार गंधर्व यांचे योगदान हे केवळ सादरीकरणापुरते मर्यादित नसून ती एक विचारांची नवी दिशा होती. त्यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित सत्यशील देशपांडे यांच्या मते, कुमारजींनी ख्याल गायकीचा पारंपरिक साचा जाणीवपूर्वक मोडला. सामान्यतः कोणताही शास्त्रीय गायक आपल्या संपूर्ण आयुष्यात ‘अष्टांग गायकी’च्या, म्हणजेच आलाप, बोल-आलाप, ताना इत्यादींच्या ठराविक क्रमावर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, कुमारजींनी हा क्रम अनिवार्य मानला नाही. त्याऐवजी, त्यांनी बंदिशीच्या प्रतिमेला किंवा तिच्या मूळ भावाला सर्वोच्च स्थान दिले. त्या विशिष्ट रचनेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अष्टांगातील जो पैलू सर्वात योग्य आणि आवश्यक असेल, त्याचाच त्यांनी वापर केला आणि अनावश्यक तांत्रिक भाग टाळला. कुमार गंधर्वांच्या गायकीत एक विलक्षण वैविध्य होते. पारंपरिक रागांपासून ते गुंतागुंतीच्या जोड-रागांपर्यंत आणि लोकगीतांपासून ते भजनांपर्यंत, त्यांनी गायलेल्या प्रत्येक रागाची एक स्वतंत्र आणि नवी व्याख्या असायची. “राग हे मानवाकडून निर्माण केले जात नाहीत, तर त्यांचा निसर्गात किंवा लोकधुनांमध्ये शोध घेतला जातो,” असे त्यांचे ठाम मत होते. याच विचारसरणीतून त्यांनी लोकसंगीताचा सखोल अभ्यास करून ‘मधसूरजा’, ‘अहिमोहिनी’, ‘सहेली तोडी’, ‘बिहड भैरव’, ‘लगन गंधार’, ‘संजारी’ आणि ‘मालवती’ यांसारख्या नवीन रागांचा शोध लावला. या रागांना त्यांनी ‘धून उगम राग’ अशी सार्थ ओळख दिली. केवळ रागदारीच नव्हे, तर सादरीकरणाच्या पद्धतीतही त्यांनी कल्पकता आणली. त्यांनी राग आणि लोकगीतांची एका विशिष्ट विषयाभोवती गुंफण करून थीमवर आधारित कार्यक्रमांची निर्मिती केली. यामध्ये ऋतूंवर आधारित ‘गीत वर्षा’, ‘गीत हेमंत’ आणि ‘ऋतुराज’ हे कार्यक्रम विशेष गाजले. या कार्यक्रमांमध्ये रचनांचा क्रम अत्यंत विचारपूर्वक लावलेला असे. यासोबतच, सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही प्रकारच्या भक्ती रचना त्यांनी आपल्या अनोख्या आणि आर्त शैलीत सादर केल्या. तसेच, दिग्गज गायक-नट बालगंधर्व यांना त्यांनी अर्पण केलेली ‘नाट्यगीत श्रद्धांजली’ ही रसिकप्रिय आणि अविस्मरणीय ठरली आहे. कुमारजींना कॅमेरा बघून वाटले होते आश्चर्य.. कुमार गंधर्वांची गायकी चित्रित करण्यासाठी एकदा जब्बार पटेल कॅमेरा घेऊन आले. मधू लिमये आणि ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकरही त्यावेळी उपस्थित होते. मैफलीत कॅमेरा पाहून कुमारजींना आश्चर्य वाटले. पंडितजींनी जब्बार पटेल यांना विचारले, कॅमेरात किती मोठा रोल आहे? किती वेळाचे गाणे चित्रित करायचे आहे? त्यावर जब्बार यांनी सांगितले, पावणे चार मिनिटे. एका चीजेसाठी पावणे चार मिनिट म्हणजे फारच अवघड काम. पण पंडितजींनी घड्याळ लावले आणि सांगितले सुरू करा चित्रीकरण. त्यांनी तराणा सुरू केला. सम बांधली आणि बरोबर 225 सेकंदात समेवर येऊन गाणे संपवले. आजारपणावर मात केल्यानंतरचे पहिले सादरीकरण कुमार गंधर्व क्षयरोगातून हळूहळू बरे झाले. परंतु, त्यांचे एक फुफ्फुस खराब झाले त्यामुळे ते मूळ पद्धतीने गाऊ शकत नव्हते. त्यांनी आपली गायन पद्धती बदलली. त्यांनी याबद्दल म्हटले होते की, “मी एका चिमणीपासून प्रेरणा घेतली जी खोलीत येत असे आणि तिचा आकार लहान असूनही ती मोठा आवाज काढायची.” डिसेंबर 1953 मध्ये अलाहाबाद येथे एक ऐतिहासिक क्षण अवतरला. सुमारे पाच-सहा वर्षांच्या प्रदीर्घ मौनानंतर आणि आजारपणाशी झुंज दिल्यानंतर कुमारजी पहिल्यांदाच रसिकांसमोर उभे राहिले होते. हे पुनरागमन अनुभवण्यासाठी प्रेक्षागृह श्रोत्यांनी खचाखच भरले होते. प्रत्येकाच्या मनात उत्सुकता आणि काहीशी धाकधूकही होती. अशा भारावलेल्या वातावरणात कुमारजींनी ‘राग लंकेशरी’च्या स्वरांनी मैफलीची सुरुवात केली आणि एका अद्भुत वातावरणाची निर्मिती झाली. त्यांचे ते संस्मरणीय सादरीकरण ऐकून उपस्थितांचे कान तृप्त झाले. इतकी वर्षे ज्या आवाजाची प्रतीक्षा होती, तो आवाज पुन्हा एकदा ऐकून रसिकांची उत्सुकता तर शमलीच, पण एका तपस्वी गायकाचे दमदार पुनरागमन जगाने अनुभवले. वसंत बापट यांनी कुमार गंधर्व यांच्यावर लिहिलेली कविता एकदा वसंत बापट यांनी कुमार गंधर्व यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत वसंत बापट यांनी कुमार गंधर्व यांच्यावर एक कविता सादर केली होती, ती अशी… सकाळच्या उन्हा सरसे
याने एकदा काय केले
दिसेल त्या आकाराला
सोन्याचे हात दिले टिंबा-टिंबात जसे
बिंब आपले भरून ठेवले
वडीलधाऱ्या वडांचेही
माथी जरा खाली लवले एवढ्यामध्ये कोणीतरी
कौतुकाची थाप दिली
तशी हा जो सावध झाला,
आपली आपण हाक ऐकून
दूर-दूर निघून गेला सूर्यासन्मुख सूर्यफूल
एक टक तप करते
धरणीवरती पाय रोवून
आकाशाचा जप करते तसा तोही इमानदार,
उग्र एकाग्र झाला
तेव्हा म्हणे कोणी याला
आदराचा मुजरा केला तशी हा जो तडक उठला,
मृगजळ पिण्यासाठी
रानोमाळ धावत सुटला
खजुरीच्या बनामध्ये
संध्याकाळची सावली झाला तेव्हा याच्या देहावरून
लमानांचा तांडा गेला
मग म्हणे कोणी तरी
याच्यासाठी हाय म्हटले तशी याने काय केले?
कोशासारखे वेढून घेतले
कबिराचे सारे शेले
मीरेच्या मंदिरात
मारवा होऊन घुमत राहिला कोणी म्हणतात निर्गुणाच्या
डोहाचाही तळ पाहिला
एवढ्यामध्ये काय घडले
महाकाल मंदिरात
सनातन डमरू झडले कण्यामधल्या मण्यांमधून
मल्हाराची रागिण उठली
चंद्राच्या तळ्यामध्ये
हुंकाराची लाट फुटली तेव्हा म्हणे जरा कुठे
कंठामधली तहान मिटली
आता तसा कुशल आहे
आता तसा कुशल आहे
पण स्वप्नामध्ये दचकून उठे
म्हणे माझा सप्त वर्ण
शाम कर्ण घोडा कुठे…?
