बातमी ऐका (Marathi Voice Reader)
मुंबई: कोकणवासीयांसाठी एक खूशखबर आहे. नुकतेच मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सावंतवाडी रोड ही नवी एक्स्प्रेस नियमित दैनिक स्वरूपात सुरू केली. मात्र, ही गाडी प्रत्यक्षात सुरू झाली नव्हती. आता आजपासून (8 सप्टेंबर) सीएसएमटी-सावंतवाडी रोड एक्स्प्रेस दररोज चालवण्यात येणार असून त्याचे आरक्षण देखील आजपासून सुरू होत आहे. तर परतीच्या प्रवासात ही गाडी 9 सप्टेंबरपासून धावणार आहे. या एक्स्प्रेसमुळे कोकणात जाणारे नागरिक, पर्यटक आणि गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळेल.
कोकणवासीयांच्या मागणीनुसार सीएसएमटी ते सावंतवाडी रोड ही गाडी दररोज सुरू करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला होता. त्यानुसार 3 सप्टेंबर 2026 रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या गाडीचा शुभारंभ करण्यात आला. मात्र, आतापर्यंत प्रवासी या गाडीच्या प्रतीक्षेतच होते.
कोकण ते विदर्भ महाराष्ट्रात पाऊस पडणार की पुन्हा टेन्शन वाढणार? आजचं हवामान अपडेट
सीएसएमटी-सावंतवाडी रोड गाडीचे वेळापत्रक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी रोड एक्सप्रेस (गाडी क्रमांक 15087) आज 8 सप्टेंबरपासून दररोज चालवण्यात येईल. तसेच सावंतवाडी रोड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस (गाडी क्रमांक 15088) ही उद्या 9 सप्टेंबरपासून दररोज चालवण्यात येणार आहे.
मुंबई सीएसएमटी येथून ही गाडी दररोज 23:55 वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे 13:50 वाजता पोहोचेल. तर पावसाळ्यानंतरच्या वेळापत्रकानुसार (21 ऑक्टोबर) ती दुसऱ्या दिवशी 14:15 वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात कोकणातून मुंबईत येताना सावंतवाडी रोड येथून 17:00 वाजता गाडी सुटेल. तर पावसाळ्यानंतर 17:20 वाजता सुटेल. त्यानंतर मुंबईत दुसऱ्या दिवशी 06:40 वाजता गाडी पोहोचेल.
थांबे कुठं?
सीएसएमटी ते सावंतवाडी रोड एक्स्प्रेस गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
कोकणवासियांना दिलासा
कोकणात गणेशोत्सवासह विविध सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. येत्या 14 सप्टेंबरपासून होणारा गणपती उत्सव आणि त्यानंतर नवरात्री, महाशिवरात्री, होळी-धुळवड यासाठी कोकणवासीय गावी जातात. तसेच मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीला कोकणात जाणाऱ्यांसाठी देखील ही गाडी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.