Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का?:1672 पूर्वी दोघांच्या भेटीचे पुरावे नाहीत, पण एका पत्रात राजे भेटीस येत असल्याचा उल्लेख

बागेश्वर धामच्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सततच्या युद्धामुळे थकलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींकडे आपला राजपाठ सोपवण्याची इच्छा व्यक्त केल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा रामदास स्वामी हे खरेच शिवाजी महाराजांचे गुरू होते काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. काही इतिहासकार या प्रश्नाचे उत्तर ‘होय’ अशी मान डोलावून देतात, तर काही ठामपणे नकार देतात. आता धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे पुन्हा एकदा या वादाला फोडणी मिळाली आहे. त्यामुळे शिवाजी महाराज व समर्थ रामदासांच्या भेटीविषयी इतिहासकारांचे मतमतांतरे काय आहेत हे जाणून घेऊया… सर्वप्रथम पाहूया काय म्हणाले धीरेंद्र शास्त्री? धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा नागपुरात एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते असा दावा केला. ते म्हणाले, सततच्या युद्धामुळे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा खूप थकले, तेव्हा ते एकेदिवशी रामदास स्वामी यांच्याकडे गेले. तिथे त्यांनी आपला मुकूट काढला आणि म्हणाले, आम्ही खूप युद्ध लढले. आता आम्हाला आणखी लढायचे नाही. आता आमच्यावर एक मोठी दया करा, हा माझा मुकूट तुम्ही सांभाळा. हा राजपाठही तुम्हीच सांभाळा. तुमच्या आज्ञेनेच आम्ही इथपर्यंत वाटचाल केली. आता आम्हाला चालणे अवघड झाले आहे. आता आम्हाला युद्ध लढणेही होत नाही. आता आम्ही खूप थकलो. आता आम्हाला विश्रांतही हवी आहे. आता आम्हाला आराम करायचा आहे. आता आम्हाला काही दिवस काहीच करायचे नाही, असे शिवाजी महाराज रामदास स्वामींना म्हणाले. त्यावर रामदास स्वामींनी त्यांची समजूत काढली आणि त्यांना उपदेश केला, असे बागेश्वर बाबा म्हणाले. बागेश्वर बाबा यांच्या या दाव्यावर राज्याच्या राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसने या प्रकरणी बागेश्वर बाबांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. आता थोडेसे इतिहासात डोकावू… बहुतांश इतिहास अभ्यासक व इतिहासकारांच्या मते, 1672 पूर्वी शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांची भेट झाल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे स्वराज्य निर्मितीच्या काळात व शिवाजी महाराजांच्या बालपणी रामदासांनी त्यांना मार्गदर्शन करणे शक्य नाही. तसे कोणते पुरावेही उपलब्ध नाहीत. वसंतराव वैद्य यांनी ‘श्री शिव-समर्थ भेट’ नामक एक पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक चाफळच्या श्रीराम देवस्थान ट्रस्टने प्रकाशित केले. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत असे म्हटले आहे की, ‘शिवाजी महाराज आणि रामदास समर्थ यांची शिंगणवाडी बागेत भेट झाली. त्याजागी समर्थ व शिवाजी महाराज यांच्या संगमरवरी मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली व मंदिर बांधण्यात आले.’ या निमित्ताने हे पुस्तक लिहून प्रसिद्ध होत असल्याचे चाफळच्या श्रीराम देवस्थान ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त रा. ना. गोडबोले यांनी नमूद केले आहे. त्यानुसार, हे पुस्तक 26 एप्रिल 1990 रोजी प्रसिद्ध झाले. प्रस्तुत पुस्तकात वैद्य यांनी लिहिले आहे की, शिवाजी महाराजांनी समर्थांच्या 11 मारुतींपैकी प्रत्येक मारुती देवस्थानाला 11 बिघे जमीन दिली. 1678 साली विजयादशमीच्या दिवशी चाफळच्या श्रीराम देवस्थानाला सनद दिल्याचेही ते म्हणतात. पुस्तकाच्या शेवटी त्यांनी ही सदनही दिली आहे. पुस्तकाच्या शेवटी छ. शिवाजी महाराज यांनी श्रीसद्गुरुवर्य श्रीसकल तीर्थरुप श्रीकैवल्यधाम श्री महाराज श्रीस्वामी – स्वामींचे सेवेसी, असा मायना लिहिला आहे. या सनदेत शिवाजी महाराज म्हणतात, चरणरज शिवाजीराजे यांनी चरणावरी मस्तक ठेवून विज्ञापना जे मजवर कृपा करून सनाथ केले आज्ञा केली की तुमचा मुख्य धर्म राज्य साधना करुन धर्मस्थापना देवब्राह्मणांची सेवा प्रजेची पीडा दूर करून पाळणरक्षण करावे हे व्रत संपादून त्यात परमार्थ करावा. प्रस्तुत सनदेत शिवाजी महाराज पुढे लिहितात, याउपरी राज्य सर्व संपादिले ते चरणी अर्पण करुन सर्व काळ सेवा घडावी असा विचार मनी आणिला तेव्हा आज्ञा जाहली की, तुम्हास पूर्वी धर्म सांगितले तेच करावेस तीच सेवा होय. म्हणजे शिवरायांनी आपले राज्य समर्थांना अर्पण केल्याचा उल्लेख केल्याचे वैद्य सांगतात. याच पुस्तकात सनदेचा सर्व अर्थ त्यांनी स्पष्ट केला आहे चाफळच्या सनदेचा उल्लेख द. वि. आपटे व रा. वि. ओतुरकर यांनी महाराष्ट्राचा पत्ररुप इतिहास या पुस्तकातही केला आहे.

इतिहास अभ्यासकांना चाफळच्या सनदेवर शंका इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी बीबीसीशी बोलताना चाफळच्या सनदेवर शंका उपस्थित केली आहे. ते म्हणतात, चाफळची सनद खरी नसल्याचे इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांनी म्हटले आहे. वैराग्य आलेल्या, सणसमारंभात भाग न घेणारे आपले बंधू व्यंकोजीराजे यांना शिवाजी महाराज यांनी याच काळात एक पत्र लिहिले होते. वैराग्य वगैरे उतारवयातल्या गोष्टी आहेत. आता पराक्रमाचे तमासे दाखवा, असे त्यांनी या पत्रात लिहिले होते. त्यामुळे शिवाजी महाराज आपल्या भावाला वैराग्यपासून परावृत्त करत असतील, तर ते स्वतःच अशा काही गोष्टी करतील असे वाटत नाही. त्यामुळे या सनदेच्या सत्यतेविषयी शंका येते. जयसिंगराव पवार यांनी मांडली संयत भूमिका ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांनी मात्र याविषयी एक अत्यंत संयत विचार मांडला आहे. ते याविषयी बोलताना म्हणतात, शिवाजी महाराज रामदास स्वामींना विचारल्याशिवाय एकही पाऊल टाकत नव्हते अशी एक मांडणी किंवा विचार आहे. हा विचार मांडणारे शे-दीडशे वर्षांपूर्वी लिहिलेल्या बखरींचा पुरावा देतात. त्या बखरींमध्ये सांगितले आहे की, रामदास स्वतः मारुतीचा अवतार असल्यामुळे ते थोडेसे पूज्यही होते. अशा काही भाकडकथा, मूर्खकथा सांगणाऱ्या काही बखरी निर्माण झाल्या. त्यात शिवाजी महाराजांना रामदासांचे शिष्यत्व दिले गेले. यामुळे त्यांचे कार्य झाकोळले गेले. त्यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीचे कार्य रामदासांना देण्यात आले. रामदासांचा पराभव त्यांच्या अनुयायांनीच केला जयसिंगराव पवार पुढे म्हणतात, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी 1901 साली रामदास नामक एक निबंध लिहिला. त्यात त्यांनी शिवाजी महाराजांचे गुरू म्हणून रामदास स्वामींना प्रोजेक्ट केले. तेव्हापासून असे माणण्यास सुरुवात झाली. पुढे ही प्रथा एवढी वाढली की, रामदास स्वामी प्रत्येक ठिकाणी येतात व शिवाजी महाराजांना उपदेश करतात आणि शिवाजी महाराज त्यानुसार कार्य करतात. एकेदिवशी काहीतरी अडथळा निर्माण झाला. ते (शिवाजी महाराज) म्हणाले, महाराजांचा मला अजून काही आदेश आला नाही. त्यामुळे मी आज काहीही काम करणार नाही. त्यांनी त्या दिवशी कोणतेही काम केले नाही. सांगायचे काय, तर ते प्रत्येक गोष्ट रामदास स्वामींना विचारून करत होते असा युक्तिवाद या प्रकरणी केला जातो. पण सत्य इतिहास काय सांगतो? पुढे एक पत्र मिळते. हे पत्र रामदास स्वामींच्या एका शिष्याने दुसऱ्या शिष्याला लिहिले आहे. त्यात एकजण म्हणतो, शिवाजी महाराज येत आहेत. त्यामुळे ती झाडीझुडी साफ करावी. त्यांचा येण्याजाण्याचा मार्ग सुकर करावा. कारण, शिवाजी राजे यांची ही पहिलीच भेट आहे. हे एप्रिल 1672 चे पत्र आहे. तोपर्यंत शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापन झाले होते. या परिस्थितीत शिवाजी महाराजांना स्वराज्याची संकल्पना रामदास स्वामींनी सांगितली हे सांगणे किंवा त्या प्रकारची माडंणी करणे हे इतिहासाला धरून नाही. त्यामुळे त्याची प्रतिक्रिया उमटते. ती कशी उमटते, तर बहुजन समाजातील इतिहासकार ही एक टोकरीच असते. एका बाजूला रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू व ते प्रत्येक गोष्ट रामदास स्वामींना विचारल्याशिवाय करतच नव्हते असे म्हटले जाते. तर दुसरीकडे, त्यांनी आदिलशहा व औरंगजेबापासून काही फरमाने घेतली होती. ते औरंगजेबाचे हेर होते असे आरोप केले जातात. पण माझ्या दृष्टिकोनातून रामदास स्वामींचे महत्त्व व महात्म्य असे आहे की, शिवाजी महाराजांचे जे युगकार्य आहे, हे समजलेला तो एक सत्पुरुष आहे. पण झाले काय आहे की, रामदासांचा सर्वात मोठा पराभव हा त्यांच्या अनुयायांनीच केला आहे, असे जयसिंगराव बीबीसीशी बोलताना म्हणाले. पवारांनी 1659 च्या पत्राचाही दिला दाखला जयसिंगराव पवार यांनी या प्रकरणी 1659 च्या एका पत्राचाही किस्सा सांगितला आहे. ते म्हणतात, शिवाजी महाराज व रामदास स्वामींच्या संदर्भात एक पहिले अस्सल पत्र सापडते. रामदास संप्रदायाच्या लोकांनीच ते प्रकाशित केले आहे. त्यात म्हटले आहे की, एक शिष्य दुसऱ्या शिष्याला म्हणतो, आम्ही राजगडावर गेलो, शिवाजी महाराजांना भेटलो आणि त्यांना रामदास स्वामींची माहिती सांगितली. त्यांच्याकडे अनुग्रह मागितला. त्यावर महाराज म्हणाले, कोण रामदास? काय करतात? कुठे असतात? त्यावर शिष्य सांगतात, ते जांबचे आहेत. सध्या आम्ही कृष्णातिरी आहोत. त्यावर महाराजांनी 200 होन त्यांना वर्षासन सुरू केले. हे पत्र आहे फेब्रुवारी 1659 चे आहे. त्यानंतर काही महिन्यांनी अफजल खान मारला गेला, असे पवार म्हणतात. छत्रपती – समर्थांच्या नात्याकडे संतुलित दृष्टीने पाहणे महत्त्वाचे दुसरीकडे, काही बखरींमध्ये 1649 साली शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांची भेट झाल्याचा संदर्भ आहे. पण त्याला कोणताही आधार नसल्याचा दावा अभ्यासक करतात. त्यामुळे शेवटी असे म्हणता येईल की, छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यात काही प्रमाणात संपर्क किंवा परस्पर सन्मानाचे नाते असण्याची शक्यता इतिहास नाकारत नाही; मात्र त्यांना पारंपरिक अर्थाने गुरू – शिष्य म्हणून निश्चितपणे सिद्ध करणारे ठोस आणि निर्विवाद पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे एका टोकाला जाऊन रामदास स्वामींना शिवरायांचे सर्वकाही मार्गदर्शक मानणे किंवा दुसऱ्या टोकाला त्यांचे महत्त्व पूर्णतः नाकारणे, या दोन्ही भूमिका इतिहासदृष्ट्या अपुऱ्या ठरतात. उपलब्ध साधनसामग्रीचा चिकित्सक विचार करता, या नात्याकडे संतुलित आणि पुराव्याधिष्ठित दृष्टीने पाहणे अधिक योग्य ठरते.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!