बातमी ऐका (Marathi Voice Reader)
सोलापूर : जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर येथील डॉ. संतोष थिटे यांनी रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय शेतीचा अवलंब केला आहे. त्यांनी स्वतःच्या शेतात गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय यशस्वीपणे सुरू केला आहे. यातून वर्षाला सहा ते सात लाख रुपयांची उलाढाल करत आहेत.
गांडूळ खत निर्मिती
डॉ. थिटे यांनी गांडूळ खत निर्मितीसाठी शेतातील काडीकचरा, वाळलेली पाने, पिकांचे अवशेष आणि पशुधनाचे शेण वापरले आहे. हे सर्व घटक एकत्र करून 3 ते 4 फूट रुंद आणि सोयीस्कर लांबीचे बेड सावलीत तयार केले जातात. यावर विशिष्ट प्रजातीची गांडुळे सोडून नियमितपणे पाण्याचा शिडकावा करून ओलावा राखला जातो. गांडुळे सेंद्रिय कचरा आणि शेण खाऊन त्याचे उच्च दर्जाच्या खतात रूपांतर करतात.
खत निर्मितीचा कालावधी आणि विक्री
योग्य काळजी आणि नियोजनाने साधारणपणे 45 ते 60 दिवसांत उत्कृष्ट दर्जाचे गांडूळ खत तयार होते. हे खत काळ्या रंगाचे, भुसभुशीत आणि चहाच्या पावडरसारखे दिसते. बाजारात या गांडूळ खताची किंमत गुणवत्ता आणि वजनानुसार 10 ते 15 रुपये प्रति किलो असते. या खताच्या विक्रीतून डॉ. संतोष थिटे वर्षाला सहा ते सात लाख रुपयांची उलाढाल करतात.
डॉ. संतोष थिटे यांच्या मते, गांडूळ खताच्या वापरामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि पिकांना आवश्यक असणारी मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये मुबलक प्रमाणात मिळतात. रासायनिक खतांवरील खर्च वाचवून शेती शाश्वत करण्यासाठी इतर शेतकऱ्यांनीही गांडूळ खत निर्मितीचा अवलंब करावा, असा संदेश त्यांनी दिला आहे.