सुरक्षा किटशिवाय फवारणी करू नका; कृषि विभागाचा शेतकऱ्यांना इशारा
सुरेश पाचभाई | मारेगाव
मारेगाव : सध्याची पावसाची उघडीप आणि प्रतिकूल वातावरणामुळे कपाशी पिकावर विविध किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यातच पोळ्याची अमावस्या असल्याने शेतकऱ्यांनी कपाशीवरील फवारण्यांना सुरुवात केली आहे. मात्र, सध्या असलेले दमट वातावरण लक्षात घेता कीटकनाशकांच्या फवारणीतून विषबाधा होण्याचा धोका वाढला असून, शेतकऱ्यांनी सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी दिपाली खवले यांनी केले आहे.
कपाशीवरील किडी व रोगांच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी केवळ शिफारशीत कीटकनाशकांचाच वापर करावा. फवारणी करताना कीटकनाशके त्वचेवर पडणार नाहीत, तसेच डोळे, नाक व तोंडात जाणार नाहीत, यासाठी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी हातमोजे, गॉगल, मास्क आणि व्यवस्थित जोडे असलेले सुरक्षा किट वापरूनच फवारणी करावी, असे कृषि विभागाने स्पष्ट केले आहे.
गावागावांत चित्ररथातून जनजागृती
तालुका कृषि अधिकारी, तालुका प्रशासन आणि सिंजेंटा इंडिया प्रा. लिमिटेड यांच्या माध्यमातून गावागावांत चित्ररथ फिरवून सुरक्षित फवारणीबाबत जनजागृती करण्यात आली आहे. तसेच तालुका कृषि अधिकारी, मारेगाव यांच्याकडून आयोजित प्रशिक्षण आणि विविध सभांमधून शेतकऱ्यांना सुरक्षित कीटकनाशक हाताळणी व फवारणीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. यावेळी प्रात्यक्षिकांद्वारे सुरक्षित फवारणीच्या पद्धतींची माहिती देऊन शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यात आली.
फवारणी करताना निष्काळजीपणा टाळून योग्य सुरक्षा साधनांचा वापर करणे गरजेचे आहे. पीक वाचविताना शेतकऱ्यांचा जीव धोक्यात येऊ नये, यासाठी सुरक्षित फवारणी हाच एकमेव मार्ग आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जिविताची सुरक्षा करूनच फवारणी करावी, असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे.