बातमी ऐका (Marathi Voice Reader)
मुंबई : मुंबईच्या पाच प्रवेशद्वारांवरील टोलनाक्यांवर आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) टोलच्या दरांत मोठी वाढ केली आहे. वाशी, ऐरोली, मुलुंड, एलबीएस आणि दहिसर येथील टोलनाक्यांवर हे नवे दर आज, 1 ऑक्टोबर 2026 पासून लागू होतील.
मुंबईच्या प्रवेशद्वारावरील पाचही टोलनाक्यांवर मिनी बस, एल.सी.व्ही. ट्रक, बस आणि अवजड वाहनांसाठीच्या टोल दरात 15 ते 35 रुपयांची वाढ झाली आहे. नवीन टोलचे दर गुरुवारी, 1 ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत. त्यानुसार मिनी बस, एल.सी.व्ही. वाहनांसाठी 90 रुपये, ट्रक, बससाठी 180 रुपये आणि अवजड वाहनांसाठी 225 रुपये मोजावे लागतील.
Weather Alert: ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी वारं फिरलं, महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं, पाऊस नव्हे आता वेगळाच अलर्ट
5 प्रवेशद्वारांवर टोलवसुली
मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करून प्रवास अतिजलद करण्यासाठी एमएसआरडीसीने मुंबईत 55 उड्डाणपूल बांधले आहेत. या पुलांचा बांधकाम खर्च वसूल करण्यासाठी वाशी, ऐरोली, मुलुंड, एलबीएस आणि दहिसर या ठिकाणी पथकर नाके उभारण्यात आले आहेत. ही पथकर वसुली 2027 पर्यंत सुरू राहणार आहे.
या वाहनांना टोलमाफी
मुंबईच्या 5 प्रवेशद्वारांवर पथकर वसुली सुरू करण्यात आली होती. मात्र, ऑक्टोबर 2024 पासून हलकी खासगी वाहने, शालेय वाहने तसेच एसटी आणि बेस्टच्या बसना टोलमाफी दिली होती. तेव्हापासून या वाहनांना कोणताही पथकर आकारला जात नसल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता. आता पथकराच्या दरांत वाढ झाली असली तरी या वाहनांची टोलमाफी कायम राहणार आहे.
दरम्यान, मुंबईतील वाशी, ऐरोली, मुलुंड, एलबीएस, दहिसर या टोल नाक्यांवरून दिवसाला साडे तीन लाखांहून अधिक वाहने ये-जा करतात. विशेष म्हणजे या वाहनांपैकी 80 टक्के वाहने हलकी व टोलमुक्त आहेत.
दर तीन वर्षांनी टोलवाढ
मुंबईच्या प्रवेशद्वारांवरील टोलच्या दरात दर तीन वर्षांच्या अंतराने सुधारणा केली जाते. यापूर्वी ऑक्टोबर 2023 मध्ये दर बदलण्यात आले होते. त्यानंतर आता दरवाढ करण्यात आली आहे. या पाच टोल नाक्यावर टोलवसुलीची व्यवस्था पुढेही सुरू राहील. आता टोलवसुलीची मुदत सप्टेंबर 2029 पर्यंत वाढविण्यात आली आहे.