बातमी ऐका (Marathi Voice Reader)
जितेंद्र जाधव, प्रतिनिधी बारामती: पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. बारामती तालुक्यातील शेरेवाडी येथे मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी दोन महिलांची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या केली आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे बारामती तालुका आणि परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
घराबाहेर झोपलेल्या असतानाच घडला प्रकार
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, माजी सरपंच इंदुबाई मारुती लडकत (वय ७५ वर्षे) आणि कृष्णाबाई कुंडलिक लडकत (वय ६५ वर्षे) या दोन्ही महिला रात्री आपल्या घराबाहेर झोपलेल्या होत्या. याच दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात इसमांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोरांनी दोन्ही महिलांचा गळा चिरल्याने अतिरक्तस्रावामुळे त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट; पोलीस घटनास्थळी दाखल
सकाळी ही घटना उघडकीस येताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना पाचारण केलं. माहिती मिळताच पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि दोन्ही महिलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. या हत्येमागील नेमकं कारण काय होतं? चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाला की काही जुना वाद होता? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
तपासासाठी पथके रवाना
या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असून ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आलं आहे. परिसरातील संशयित व्यक्तींची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मध्यरात्री अशा प्रकारे दोन वृद्ध महिलांची निर्दयीपणे हत्या झाल्यामुळे परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.