बातमी ऐका (Marathi Voice Reader)
अमरावती शहरातील बडनेरा येथील नामांकित राम मेघे महाविद्यालयात एका विद्यार्थिनीवर तिच्याच वर्गातील एका तरुणाने चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या विद्यार्थ्याने कॉलेज परिसरामध्येच या तरुणीच्या गळ्यावर चाकूने वार केले. या घटनेमुळे अमरावती जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
बॅगमध्ये आणला होता चाकू; हल्ला पूर्वनियोजित असल्याचा संशय
पीडित विद्यार्थिनी आणि आरोपी नवीन वानवाणी हे दोघेही राम मेघे महाविद्यालयात ‘डिप्लोमा इन फार्मसी’ (D.Pharm) च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहेत. घटना घडली त्यादिवशी दोघेही कॉलेजच्या परिसरात होते. यावेळी आरोपी नवीन वानवाणी याने आपल्या बॅगमध्ये आधीच चाकू आणला होता.
प्रॅक्टीकल पूर्ण झाल्यानंतर नवीनने विद्यार्थिनीवर हल्ला करत तिच्या गळ्यावर चाकूने वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पीडित तरुणी रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि गंभीर जखमी झाली. आरोपीने बॅगमध्ये आधीच शस्त्र आणल्यामुळे हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
भावाच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल
घटना घडल्यानंतर लगेचच जखमी विद्यार्थिनीला अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. काल तिच्यावर तातडीने यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली असून, सुदैवाने आता तिची प्रकृती स्थिर असून तिचा जीव धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
या प्रकरणी पीडित तरुणीच्या भावाने बडनेरा पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबात नमूद केले आहे की, आरोपी नवीन वानवाणी याने विद्यार्थिनीकडे तिचे प्रॅक्टिकल लिहून देण्याची मागणी केली होती. मात्र, तिने प्रॅक्टिकल लिहून देण्यास स्पष्ट नकार दिल्याने चिडलेल्या नवीनने हे टोकाचे पाऊल उचलले.
इतर कारणांचाही पोलीस शोध घेत आहेत
बडनेरा पोलिसांनी आरोपी नवीन वानवाणी याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडील चाकू जप्त केला आहे. प्रॅक्टिकल लिहून न देणे हेच या प्राणघातक हल्ल्यामागील मुख्य कारण आहे की यामागे काही एकतर्फी प्रेमाचा किंवा जुन्या वादाचा संदर्भ आहे, यादृष्टीने पोलीस सर्व बाजूंनी अधिक तपास करत आहेत. विशेष म्हणजे याआधी ३ सप्टेंबर रोजी देखील अमरावतीच्या रवी नगर परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन महाविद्यालयीन युवतीवर भररस्त्यात चाकूने गळ्यावर वार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. एकाच महिन्यात शहरातील ही दुसरी चाकू हल्ल्याची घटना घडल्याने पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.