बुरांडा (ख)येथील दिनेश टेकाम यांचा उपचारादरम्यान मृत्यू; मारेगाव पोलिसांकडून मर्ग दाखल
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव : शेतालगतच्या नाल्यावर हात-पाय धुत असताना उजव्या हाताला काहीतरी चावल्याचे सांगितल्यानंतर चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना बुरांडा (ता. मारेगाव) येथे घडली. दिनेश लेतू टेकाम (४०, रा. बुरांडा, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश टेकाम हे २४ सप्टेंबर रोजी सकाळी शेतात काम करण्यासाठी गेले होते. सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास शेतालगतच्या नाल्यावर हात-पाय धुण्यासाठी गेले असता त्यांच्या उजव्या हाताला काहीतरी चावल्याचे त्यांनी कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर त्यांच्या उजव्या हाताला सूज आल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले.
दरम्यान, २८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास दिनेश यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांच्या मुलाने नातेवाईकांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांना तातडीने ऑटोरिक्षाने मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या जबानी अहवालासह डॉक्टरांच्या डेथ मेमोच्या आधारे मारेगाव पोलिसांनी मर्ग नोंदवून तपास सुरू केला आहे.
दरम्यान, दिनेश टेकाम यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही. नाल्यावर त्यांना नेमक्या कोणत्या जीवामुळे अथवा कारणामुळे इजा झाली आणि त्या घटनेचा त्यांच्या मृत्यूशी थेट संबंध आहे का, याबाबतही अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणी तसेच पोलिसांच्या पुढील तपासातून स्पष्ट होणार आहे.
दिनेश टेकाम यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. ठाणेदार सागर दानडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तूजी किनाके व सागर दिपेवार पुढील तपास करीत आहेत.