बातमी ऐका (Marathi Voice Reader)
छत्रपती संभाजीनगर: ज्या वयात आईच्या कुशीत सुरक्षित असायला हवे, त्या अवघ्या एका महिन्याच्या बाळाची पैशांसाठी चक्क खरेदी-विक्री करण्यात आली. आई-वडिलांकडून घेतलेले हे बाळ पुढे एक-दोन नव्हे, तर तब्बल तीन वेळा वेगवेगळ्या व्यक्तींच्या हातात गेले. सुरुवातीला 1 लाख 20 हजार रुपयांत झालेला या बाळाचा सौदा पुढे हैदराबादमध्ये साडेतीन लाख रुपयांपर्यंत पोहोचला. या धक्कादायक प्रकरणाचा मुकुंदवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला असून, बारावी नापास असलेल्या बोगस डॉक्टरसह सात जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
या प्रकरणात बाळाचे आई-वडील, सीमा रेशवाल, तिची आई कौशल्या पवार, पडेगाव येथील संगीता आव्हाड, तेलंगणातील पिग्गेरला येथील डॉ. सुरेश गुंटुका आणि हैदराबादमधील तालागड येथील उमा गंगाधर खटकम यांचा समावेश असल्याची माहिती मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक विवेक सोनवणे यांनी दिली.
छ. संभाजीनगरात रूम शोधली अन् जीवलग मित्र गावी निघाले, दौलताबाद घाटात भयंकर घडलं, एकाचा जीव गेला, दुसरा गंभीर
बारावी नापास डॉक्टर
या रॅकेटमधील मुख्य सूत्रधार डॉ. सुरेश गुंटुका हा बारावी नापास असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. तरीही अनुभवाच्या प्रमाणपत्राच्या आधारे तो तेलंगणात डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत होता. शहरातील आयव्हीएफ सेंटर्समध्ये रुग्णांना आणण्याच्या कामानिमित्त त्याचे छत्रपती संभाजीनगरमध्ये येणे-जाणे होते. गुंटुका याच्या भावाच्या मेहुण्याला बाळ नसल्याने त्यांनी बाळ घेण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर संगीता आव्हाड आणि सीमा रेशवाल यांनी बाळ देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया करून देण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनावर विश्वास ठेवून सुरेश गुंटुका याने मध्यस्थी केली आणि बाळ त्याच्या भावाच्या मेहुण्याची पत्नी उमा हिच्याकडे सोपवण्यात आले.
एका महिन्याच्या बाळाची तीनदा विक्री
पोलिस तपासानुसार, 7 ऑगस्ट रोजी सीमा रेशवाल हिने बाळाच्या आईकडून बाळ घेतले. त्याच दिवशी हे बाळ संगीता आव्हाड हिच्याकडे सोपवण्यात आले. त्यानंतर 8 ऑगस्ट रोजी सुरेश गुंटुका आणि संगीता यांची नांदेड येथे भेट झाली. या भेटीत बाळाची देवाणघेवाण करण्यात आली. पुढे गुंटुका याने बाळ उमा खटकम हिच्याकडे सोपवले. अशा प्रकारे अवघ्या एका महिन्याच्या बाळाची तीन वेळा खरेदी-विक्री झाल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. सुरुवातीला 1 लाख 20 हजार रुपयांत झालेला हा व्यवहार पुढे हैदराबादमध्ये साडेतीन लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
आई-बापाने बाळ विकून घेतले कपडे
बाळ विकून मिळालेल्या 1 लाख 20 हजार रुपयांतून जन्मदात्या पालकांनी 25 हजार रुपयांचा मोबाइल आणि 62 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने खरेदी केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. तर या व्यवहारातील मध्यस्थ सीमा रेशवाल हिने स्वतःकडे 1 लाख 10 हजार रुपये ठेवले आणि तिच्या आईला 40 हजार रुपये दिले. या पैशातून खरेदी करण्यात आलेला मोबाइल आणि सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.
पोलिसांच्या भीतीने…
बाळाच्या विक्रीचे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर आरोपींमध्ये अटकेची भीती निर्माण झाली. त्यानंतर उमा खटकम आणि सुरेश गुंटुका यांनी 27 सप्टेंबर रोजी बाळाला स्वतःहून पोलिस ठाण्यात आणून हजर केले. बाल कल्याण समितीच्या आदेशानंतर बाळाला साकार संस्थेच्या ताब्यात देण्यात आले आहे.
शेवटी सत्य समोर आलंच…
या प्रकरणातील मुख्य आरोपी सीमा रेशवाल सुरुवातीला पोलिस कोठडीत कोणतीही माहिती देण्यास तयार नव्हती. मात्र, तिच्या संपूर्ण कुटुंबालाही या प्रकरणात आरोपी करून अटक करण्याची तयारी पोलिसांनी दर्शवल्यानंतर तिने अखेर पोलिसांसमोर सत्य सांगितले. बाळाची खरेदी-विक्री नेमक्या कोणत्या उद्देशाने करण्यात आली, या व्यवहारात पैशांची संपूर्ण देवाणघेवाण कशी झाली आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास मुकुंदवाडी पोलिसांकडून सुरू आहे.