बातमी ऐका (Marathi Voice Reader)
नवरात्री उत्सव सुरू होण्याच्या तोंडावरच मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. तुळजापूर येथून देवीची ज्योत घेऊन आपल्या गावाकडे परतणाऱ्या तरुणांवर काळाने घाला घातला आहे. एका भरधाव कंटेनरने तरुणांच्या दुचाकीला धडक दिली. ज्यात तीन तरुणांचा करुण अंत झाला आहे. शनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास बीड-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव पांढरी (ता. छत्रपती संभाजीनगर) परिसरात ही अपघाताची घटना घडली. या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे खुलताबाद तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नक्की घटना कशी घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, खुलताबाद तालुक्यातील गोळेगाव आणि जाफ्राबादवाडी येथील काही तरुण श्रीक्षेत्र तुळजापूर येथून आई तुळजाभवानीची ज्योत आणायला गेले होते. तुळजापुरात त्यांनी देवीचं दर्शन घेतलं आणि ज्योत घेऊन आपल्या गावाकडे निघाले. यावेळी काही तरूण ज्योत घेऊन धावत होते. तर तेल पुरवठा करणारे दोघे जण दुचाकीवरून (एमएच २० सीएस ००७४) सोबत चालले होते.
दरम्यान, बीड-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव पांढरी परिसरात मागून येणाऱ्या एका अज्ञात भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, कंटेनरने दुचाकीला तब्बल ५ किलोमीटरपर्यंत रस्त्यावरून घासत नेले. या अपघातात जाफ्राबादवाडी येथील रहिवासी असलेला आणि काटशेरी फाटा येथे गॅरेज चालवणारा अक्षय राजपूत याचा जागीच मृत्यू झाला. तर गोळेगाव येथील अमोल औटे व गोरख म्हस्कर या दोघांचा छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच या दुर्घटनेत शुभम आधाने हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटना घडल्यानंतर कंटेनरचालकाने घटनास्थळावरून वाहनसह पळ काढला आहे. या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं आणि जखमींना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं. याप्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. नवरात्रोत्सवाच्या पवित्र काळात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.