बातमी ऐका (Marathi Voice Reader)
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अंतर्गत तब्बल १६ हजार ७१७ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीमध्ये २७ संवर्गांमधील सुधारित पदसंख्येचा समावेश करण्यात आला असून, सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत २७ नोव्हेंबर असून, इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. मात्र, अर्ज भरताना पात्रता, शैक्षणिक माहिती, पदांची निवड आणि संवर्ग याबाबत अनेक उमेदवारांमध्ये संभ्रम असतो. त्यामुळे अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण प्रक्रिया समजून घेणे महत्त्वाचे आहे.
MPSC अर्ज करण्याची प्रक्रिया
अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत ऑनलाइन अर्ज प्रणालीला भेट द्यावी. गुगलवर MPSC Online असे सर्च केल्यानंतर आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन लॉगिन करावे. यापूर्वी खाते तयार केले असल्यास संबंधित युजर आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून लॉगिन करता येईल. नवीन उमेदवारांना आवश्यक माहिती भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. लॉगिन केल्यानंतर उपलब्ध भरती प्रक्रियेची माहिती तपासून महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या भरतीची निवड करावी.
‘मी गेल्यानंतर माझं शरीर फक्त विद्यार्थ्यांसाठी’, गजानन यांची शेवटची इच्छा पूर्ण झाली! पुणेकर माणसाचा आदर्श Video
त्यानंतर अर्जामध्ये वैयक्तिक माहिती, जन्मतारीख, पत्ता, शैक्षणिक पात्रता, आरक्षणाचा संवर्ग, इतर आवश्यक तपशील भरावे लागतील. उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता आणि संबंधित पदासाठी आवश्यक अटी तपासूनच पदांची निवड करावी. अर्जामध्ये उपलब्ध असलेल्या पदांची माहिती वाचून आपण पात्र असलेल्या पदांसाठीच प्राधान्य द्यावे. चुकीची पदनिवड केल्यास पुढील प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात.
शैक्षणिक पात्रता
या भरतीमध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक अशा विविध पदांचा समावेश असल्याने सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता सारखी नाही. काही पदांसाठी पदवी आवश्यक आहे, तर काही पदांसाठी विशिष्ट विषयातील पदवी, पदव्युत्तर शिक्षण किंवा तांत्रिक पात्रता आवश्यक असू शकते. त्यामुळे उमेदवारांनी संबंधित पदाच्या जाहिरातीतील पात्रतेचे निकष काळजीपूर्वक वाचावेत.
याबाबत अभ्यास मंडळाचे पुणे संचालक आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक संदीप जाधव यांनी सांगितले की, एमपीएससीच्या माध्यमातून १६ हजार ७१७ पदांची ही मोठी भरती होत आहे. यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणावर भरती झालेली नसल्याने विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. तांत्रिक आणि अतांत्रिक अशा दोन्ही प्रकारच्या पदांसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे. मात्र, अर्ज भरताना प्रत्येक पदाची शैक्षणिक पात्रता तपासणे महत्त्वाचे आहे.
उदाहरणार्थ, कृषी सेवक, कृषी अधिकारी किंवा तत्सम पदांसाठी संबंधित शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता असू शकते. उमेदवाराने केवळ पदाचे नाव पाहून अर्ज न करता, त्या पदासाठी आवश्यक असलेले शिक्षण आणि इतर अटी पूर्ण होतात का, हे तपासावे. अर्जामध्ये पात्र नसलेल्या पदांची निवड टाळावी.
अर्ज पुन्हा तपासा
अर्जातील सर्व माहिती भरल्यानंतर उमेदवारांनी संपूर्ण अर्ज पुन्हा एकदा तपासावा. नाव, जन्मतारीख, शैक्षणिक गुण, आरक्षण, पदांची निवड आणि इतर तपशील अचूक असल्याची खात्री करावी. त्यानंतर आवश्यक अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरून अर्ज सबमिट करावा. अर्ज सादर झाल्यानंतर त्याची पावती किंवा अर्ज क्रमांक जतन करून ठेवणे आवश्यक आहे.
अर्ज भरण्यासाठी ऑफलाइन सुविधा उपलब्ध नसून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करावी लागणार आहे. अर्ज करताना तांत्रिक अडचणी आल्यास आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरील सुविधा किंवा संपर्क माध्यमांचा वापर करावा. अंतिम मुदत २७ नोव्हेंबर असल्याने शेवटच्या दिवसापर्यंत अर्ज भरण्याची वाट न पाहता वेळेत प्रक्रिया पूर्ण करावी. मोठ्या पदभरतीची संधी उपलब्ध असल्याने पात्र उमेदवारांनी अर्ज करताना कोणतीही चूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी.