बातमी ऐका (Marathi Voice Reader)
पुणे: शिवाजीनगर कोर्टाच्या बाहेर झालेल्या गोळीबार आणि कोयता हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण पुणे शहरच नव्हे तर महाराष्ट्रदेखील हादरून गेला आहे. या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मंदार मारुती किवळे याच्यावर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या धक्कादायक घटनेनंतर आता मंदारच्या वकिलांनी हल्ल्याच्या १० मिनिटे आधी नेमके काय घडले, शुभम चव्हाण हत्या प्रकरणात मंदारची काय भूमिका होती आणि हल्ल्यानंतर काय झालं, याचा संपूर्ण घटनाक्रम उघड केला.
मंदार किवळेवर झालेला हा हल्ला दीड वर्षापूर्वीच्या एका हत्या प्रकरणाशी संबंधित असल्याची माहिती आहे. मंदार किवळे आणि इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या या हल्ला प्रकरणाने राज्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. या हल्ल्याच्या काही तासातच पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवत सहा आरोपींना अटक केली आहे. त्यांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
हल्ल्याआधी १० मिनिटे नेमकं काय घडलं?
चारच दिवसांपूर्वी मंदार किवळे जामिनावर बाहेर आला होता. बुधवारी, कोर्टाच्या तारखेच्या कामासाठी मंदार शिवाजीनगर न्यायालयात हजर झाला होता. कोर्टातील कामकाज आटोपल्यानंतर मंदार आणि त्याच्या वकिलांमध्ये चर्चा झाली. "आपले आजचे न्यायालयीन कामकाज पूर्ण झाले आहे, त्यामुळे तू आता घरी जाऊ शकतोस," असे वकिलांनी मंदारला सांगितले. वकिलांशी बोलून मंदार न्यायालयाच्या आवारातून बाहेर पडला आणि अवघ्या काही मिनिटांतच बाईकवरून आलेल्या पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्याला गाठले.
गोळीबार, कोयत्याचे वार अन् बघ्यांची गर्दी
वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदार बाहेर पडल्यानंतर अचानक गोळीबाराचे आवाज ऐकू आले. नेमके काय झाले हे पाहण्यासाठी वकील बाहेर धावले असता, पाच ते सहा हल्लेखोरांनी मंदारला घेरले होते. त्यातील दोघांनी मंदारला संपवण्याच्या इराद्याने त्याच्या डोक्यावर आणि हातावर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात मंदार रक्ताच्या थारोळ्यात कोसळला, त्यानंतर हल्लेखोर बाईकवरून पसार झाले.
शुभम चव्हाण हत्या प्रकरण अन् मंदारची भूमिका
कात्रज परिसरातील संतोषनगर येथे २० एप्रिल २०२५ रोजी जमिनीच्या वादातून शुभम चव्हाण याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात मंदार किवळे याला आरोपी करण्यात आले होते. मात्र, मंदारच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदारला या खून प्रकरणात खोटे गोवण्यात आले होते, असा दावा केला आहे. या प्रकरणात मंदार येरवडा कारागृहात होता आणि अवघ्या चार दिवसांपूर्वीच त्याला न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला होता.
मदतीऐवजी व्हिडीओ काढत बसले….
या रक्तरंजित थरारानंतर घडलेल्या प्रकाराबद्दल मंदारच्या वकिलांनी तीव्र संताप आणि खंत व्यक्त केली आहे. "हा सर्व प्रकार सुरू असताना तिथे पोलीस उपस्थित होते, मात्र हल्लेखोरांना रोखण्याची हिम्मत कुणीही केली नाही. मंदार रक्ताच्या थारोळ्यात तडफडत असताना १० मिनिटे एकही रुग्णवाहिका तिथे पोहोचली नाही. आम्ही उपस्थित रिक्षाचालकांना त्याला रुग्णालयात नेण्यासाठी विनवणी करत होतो, पण कोणीही तयार झाले नाही. एकीकडे एक तरुण मृत्यूशी झुंज देत असताना, तिथे जमलेले लोक मदत करण्याऐवजी केवळ मोबाईलवर फोटो आणि व्हिडिओ काढण्यात मग्न होते," असा धक्कादायक अनुभव वकिलांनी सांगितला आहे.
इतर संबंधित बातमी:
कात्रजमध्ये २० एप्रिल २०२५ रोजी काय घडलं होतं? त्याचा बदला घेण्यासाठी दीड वर्ष वाट पाहिली अन् मंदारचा गेम केला