बातमी ऐका (Marathi Voice Reader)
कोल्हापूर, प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे: ऊसदराच्या मुद्द्यावरून गेल्या 61 तासांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी किणी टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली. ऊसाला पहिली उचल 3,900 रुपये देण्यास कारखानदारांनी तयारी दर्शवली आहे. याशिवाय साखरेच्या दरात वाढ झाल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त रक्कम देण्याचाही तोडगा काढण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ऊसदराच्या मागणीवरून शेतकरी संघटना आणि कारखानदार यांच्यात संघर्ष सुरू होता. संघटनेने सुरुवातीला 4,500 रुपये दराची मागणी केली होती. त्यानंतर 4,200 रुपयांपर्यंत तोडगा काढण्याची तयारी दर्शवण्यात आली. अखेर कारखानदारांकडून पहिली उचल 3,900 रुपये देण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ऊसाला 3,900 रुपये, साखरेचे दर वाढल्यास आणखी पैसे
राजू शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, साखरेचा दर 4,500 रुपयांच्या पुढे गेल्यास वाढीव दरातून मिळणाऱ्या अतिरिक्त रकमेत शेतकऱ्यांना 70 टक्के हिस्सा मिळणार आहे. तर कारखान्यांना 20 टक्के हिस्सा देण्याचं ठरलं आहे. म्हणजेच साखरेच्या दरात वाढ झाली तर त्याचा फायदा ऊस उत्पादकांनाही मिळणार आहे.
कारखानदारांनी सुरुवातीला 3,800 रुपये आणि त्यानंतर 200 रुपये देण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, संघटनेने मांडलेल्या भूमिकेनंतर चर्चेत बदल झाला. पहिली उचल 3,900 रुपये देण्याच्या आश्वासनासह पुढील दरवाढीचं गणितही ठरल्याचं शेट्टी यांनी सांगितलं. कोल्हापूरमध्ये ठरलेला हा फॉर्म्युला सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील कारखानदारांसोबतच्या चर्चेतही मांडण्यात आला आहे. तिथे त्याची अंमलबजावणी झाली नाही तर त्या जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र आंदोलन केलं जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
एकरकमी बिलाचा आग्रह का सोडला?
शेतकऱ्यांना ऊसाची रक्कम एकरकमी मिळावी, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी होती. मात्र, कारखानदारांकडून सहा पंधरवड्यांनुसार सहा बिलं देण्याची भूमिका मांडण्यात आली. पहिल्या दोन पंधरवड्यांची बिलं एकत्र आणि शेवटच्या पंधरवड्याची बिलं एकत्र देण्याबाबत चर्चा झाली. मधल्या दोन पंधरवड्यांच्या बिलांसाठी शेतकऱ्यांना आणखी अडवून धरणं योग्य ठरणार नाही, असं संघटनेला वाटलं. प्राथमिक मागण्या मान्य झाल्यामुळे आंदोलन स्थगित करत असल्याचं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं.
166 एसटी फेऱ्या रद्द, महामार्गावरील वाहतूक सुरू
या आंदोलनाचा परिणाम केवळ साखर कारखान्यांपुरता मर्यादित राहिला नव्हता. मुंबई-बंगळुरू आणि पुणे-बंगळुरू महामार्गावर चक्काजाम झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. एसटी महामंडळाच्या जवळपास 166 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. साताऱ्यात आंदोलकांनी ऊसाने भरलेला ट्रॅक्टर पेटवून दिल्याची घटनाही घडली होती. त्यामुळे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती.
आता आंदोलन स्थगित करण्याची घोषणा झाल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्याचा बंदही स्थगित करण्यात आल्याचं राजू शेट्टी यांनी जाहीर केलं. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर आता साखर कारखाने सुरू होण्याची प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे.