बातमी ऐका (Marathi Voice Reader)
पुणे : शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो. मात्र, कमी खर्चात आणि नैसर्गिक पद्धतीने शेतीचे उत्पादन वाढवण्याचा एक प्रभावी पर्याय म्हणजे मधमाशी पालन. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मधमाशी पालन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. शेतामध्ये मधमाशांच्या पेट्या ठेवल्यास पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढण्यास मदत होते. विशेष म्हणजे, साधारण दहा हजार रुपयांच्या एका पेटीपासून या व्यवसायाची सुरुवात करता येते.
सेंट्रल बी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशन पुणे येथील प्रशिक्षण समन्वयक राहुल काळे यांनी मधमाशी पालनाचे महत्त्व आणि त्यातून मिळणाऱ्या फायद्यांविषयी माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, शेतातील पिकांच्या फुलोऱ्याच्या काळात मधमाशांच्या पेट्या ठेवल्यास परागीभवनाची प्रक्रिया अधिक प्रभावीपणे होते. उदाहरणार्थ, एखाद्या पिकाचे उत्पादन सात ते आठ क्विंटल असेल, तर योग्य परागीभवनामुळे ते १२ ते १३ क्विंटलपर्यंत पोहोचण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनवाढीतून आर्थिक फायदा मिळू शकतो.
मधमाशी पालन सुरू करण्यासाठी सर्वप्रथम शेतातील पिकांचा प्रकार आणि फुलोऱ्याचा कालावधी समजून घेणे आवश्यक आहे. कलिंगड, काकडी, दोडका, डाळिंब यांसारखी परागीभवनावर अवलंबून असलेली पिके असल्यास मधमाशी पालन अधिक उपयुक्त ठरते. त्यानंतर मधमाशी पालनाचे योग्य प्रशिक्षण घेऊन मधमाशांची पेटी खरेदी करावी. साधारण दहा हजार रुपये एका पेटीसाठी सुरुवातीची गुंतवणूक करावी लागते. सुरुवातीला एक किंवा दोन पेट्यांपासून व्यवसाय सुरू करून अनुभव आणि गरजेनुसार पेट्यांची संख्या वाढवता येते.
दुष्काळात द्राक्षांना सोन्याचा भाव! आगाप छाटणीतून ‘कृष्णा’चा विक्रमी बहर, मिळाला उच्चांकी दर, Video
मधमाशांच्या पेटीमध्ये तळाचा भाग, ब्रूड चेंबर, मध साठवण्याचा भाग आणि वरचे झाकण असे वेगवेगळे भाग असतात. मधमाश्यांना परागकण आणि मकरंद मिळण्यासाठी पेटीच्या आसपास साधारण दोन ते तीन किलोमीटरच्या परिसरात फुलांचे स्रोत उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पेटी ठेवण्यासाठी योग्य जागेची निवड करणे आवश्यक आहे.
मधमाशी पालन करताना मधमाश्यांचे प्रकार, त्यांची कार्यपद्धती, पेट्यांची देखभाल, मध संकलन आणि सुरक्षिततेचे नियम समजून घेणे गरजेचे आहे. भारतात सातेरी, आग्या आणि इतर विविध प्रकारच्या मधमाश्या आढळतात. त्यापैकी पेटीत संगोपन करता येणाऱ्या मधमाश्यांची निवड तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावी. मधमाश्यांच्या वर्तनाची माहिती नसताना थेट व्यवसाय सुरू केल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे KVIC किंवा मान्यताप्राप्त प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेऊ शकता.
मधमाशी पालनाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पिकांचे परागीभवन आणि मधनिर्मिती या दोन्ही माध्यमांतून उत्पन्नाची संधी मिळते. मधमाश्या फुलांवर बसून परागकणांचे हस्तांतरण करतात. त्यामुळे फळधारणा सुधारण्यास मदत होते. त्याचबरोबर मधाचे संकलन करून त्याची विक्रीही करता येते. मात्र, मधाचे उत्पादन हे मधमाश्यांचा प्रकार, फुलांची उपलब्धता आणि हवामानावर अवलंबून असते.
मधमाश्या स्वभावाने विनाकारण आक्रमक नसतात. त्यांना त्रास देणे, दगड मारणे किंवा पेट्यांची अनावश्यक हालचाल करणे टाळावे. रंगीबेरंगी कपडे घातल्यानेच मधमाश्या हल्ला करतात, असा समज चुकीचा आहे. त्यांच्या वसाहतीजवळ शांतपणे आणि काळजीपूर्वक वागणे आवश्यक आहे.
एकूणच, कमी गुंतवणूक, योग्य प्रशिक्षण आणि नियोजनाच्या जोरावर मधमाशी पालन हा शेतकऱ्यांसाठी शेतीला पूरक उत्पन्नाचा चांगला पर्याय ठरू शकतो. त्यामुळे पारंपरिक शेतीसोबत मधमाशी पालनाचा विचार केल्यास उत्पादनवाढीसह आर्थिक उत्पन्नाचे नवे दालन खुले होऊ शकते.