बातमी ऐका (Marathi Voice Reader)
मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर बॅटर बोल्ड, कॅच, रन आऊट, एलबीडब्ल्यू किंवा स्टम्पिंग होतो, पण क्रिकेटच्या मैदानात अंपायरने बॅटरला ज्या कारणासाठी आऊट दिलं, ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. नेपाळ प्रीमीयर लीगमध्ये कर्णाली याक्सची कॅप्टन्सी करणाऱ्या सोमपाल कामीने असं काही केलं, ज्यामुळे त्याला आपली विकेट गमवावी लागली. विरोधी टीमने अपील केल्यानंतर अंपायरनी सोमपाल कामीला आऊट दिलं, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रागात बॅट चालवणं महागात पडलं
9 नोव्हेंबरला काठमांडूच्या कीर्तीपूरमधील त्रिभुवन युनिव्हर्सिटी इंटरनॅशनल क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या या सामन्यात ही घटना घडली आहे. कर्णाली याक्स आणि पोखरा ऍव्हेन्जर्स यांच्यात हा सामना झाला. कर्णालीच्या टीमला 218 रनचं आव्हान मिळालं, यानंतर इनिंगच्या 15व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर पोखराचा बॉलर बिपीन खत्रीने ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकला, यावर सोमपाल कामीने कट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण बॉल बॅटच्या एजला लागला आणि कामीच्या पायाजवळ येऊन थांबला.
आपल्या या शॉटमुळे नाराज झालेल्या कामीने मग बॉलला बॅटने जोरात मारलं. हे पाहून पोखराच्या खेळाडूंनी अंपायरकडे अपील केलं. खेळाडूंचं अपील पाहून मैदानातल्या दोन्ही अंपायरनी एकमेकांसोबत चर्चा केली आणि अखेर सोमपाल कामी याला ऑबस्ट्रक्टिंग द फील्ड या कारणासाठी आऊट देण्यात आलं. ऑबस्ट्रक्टिंग द फिल्ड चा अर्थ फिल्डिंगमध्ये बाधा आणणं.
अंपायरने आऊट दिल्यानंतर कामी 19 बॉलमध्ये 21 रन करून पॅव्हेलियनमध्ये परतला. क्रिकेटच्या नियमांनुसार जर एखादा बॅटर मुद्दामहून बॉल दुसऱ्यांदा मारतो आणि त्याचा उद्देश स्वत:ची विकेट वाचवणं हा नसतो तेव्हा त्याला ऑबस्ट्रक्टिंग द फिल्ड या नियमानुसार आऊट दिलं जातं. बॅटरला दुसऱ्यांदा बॉल खेळण्याची सूट तेव्हाच असते जेव्हा तो आपली विकेट वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. या प्रकरणामध्ये कामीने रागाच्या भरात बॉलला दुसऱ्यांदा मारण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्याला आऊट देण्यात आलं.
View this post on Instagram
A post shared by FanCode (@fancode)
पोखराने 63 रननी जिंकला सामना
या सामन्यात पोखरा ऍव्हेन्जर्सचा दबदबा पाहायला मिळाला. पहिले बॅटिंग करणाऱ्या पोखराने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 217 रन केले. युवराज समराने 48 बॉलमध्ये 102 रनची वादळी खेळी केली, यात 10 फोर आणि 6 सिक्सचा समावेश होता. कुशल भुर्तेलने 39 बॉलमध्ये 62 रन करून युवराजला साथ दिली. या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या कर्णाली याक्सचा 18.3 ओव्हरमध्ये 154 रनवर ऑलआऊट झाला, त्यामुळे पोखराने हा सामना 63 रननी जिंकला. महेदी हसनने 24 रन देऊन 3 विकेट घेतल्या.