बातमी ऐका (Marathi Voice Reader)
मुंबई: दिवाळी आणि भाऊबीजेचा सण हा प्रत्येक भावाबहिणीच्या नात्यातील प्रेमाचा आणि आपुलकीचा गोड धागा असतो. मात्र, यंदाची भाऊबीज पवार कुटुंबासाठी अत्यंत वेदनादायी आणि भावूक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले दिवंगत बंधू अजित पवार यांच्या आठवणीत एक अत्यंत भावूक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यासोबतच त्यांनी अजितदादांसोबतचा एक जुना व्हिडिओही पोस्ट केला आहे.
अजितदादांच्या जाण्यानंतरची ही पहिलीच भाऊबीज असल्याने सुप्रिया सुळे यांनी पोस्ट लिहित आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. अजितदादांच्या निधनामुळे पवार कुटुंबीयांनी यंदा दिवाळी देखील साजरी केली नाही. दरवर्षी बारामतीमध्ये पवार कुटुंबीय आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतात. मात्र, यंदाच्या वर्षी हा कार्यक्रम पार पडला नाही. मंगळवारी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कुटुंबीय आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजितदादांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले.
सुप्रिया सुळेंनी पोस्टमध्ये काय म्हटले?
आज भाऊबीजेच्या दिनी सुप्रिया सुळे यांनी भावूक पोस्ट लिहिली आहे. "दादा, तुझ्याशिवायची ही पहिली दिवाळी आणि पहिली भाऊबीज. दरवर्षी या दिवसाची आम्हा सगळ्या बहिणींना किती ओढ असायची! यंदा मात्र भाऊबीजेचा दिवस उजाडला आणि आपल्या असंख्य आठवणींनी मनात गर्दी केली असल्याची भावना सु्प्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
भावाबहिणीच्या प्रेमाचे क्षण आठवत त्या पुढे म्हणतात, "आपलं एकत्र येणं, गप्पा, हसणं… आम्हा बहिणींच्या घोळक्यात हरखून गेलेला तू आजही डोळ्यांसमोर उभा राहतोस. तेव्हा अगदी सहज वाटणारे ते क्षण आज किती मोलाचे वाटतात."
दादा, तुझ्याशिवायची ही पहिली दिवाळी आणि पहिली भाऊबीज. दरवर्षी या दिवसाची आम्हा सगळ्या बहिणींना किती ओढ असायची! यंदा मात्र भाऊबीजेचा दिवस उजाडला आणि आपल्या असंख्य आठवणींनी मनात गर्दी केली.
आपलं एकत्र येणं, गप्पा, हसणं… आम्हा बहिणींच्या घोळक्यात हरखून गेलेला तू आजही डोळ्यांसमोर उभा राहतोस. तेव्हा अगदी सहज वाटणारे ते क्षण आज किती मोलाचे वाटतात.
दादा, आजच्या दिवशी तुझं नसणं मनाला चटका लावून जातं. आम्हा सगळ्या बहिणींना तुझी किती आठवण येतेय, हे शब्दांत सांगणंही कठीण आहे. तू आमच्या मनात कायम आहेस आणि कायम राहशील ❤️
— Supriya Sule (@supriya_sule) November 11, 2026
अजितदादांच्या पाठीशी असलेल्या बहिणींच्या या ओढ आणि आठवणींचा उल्लेख करत त्यांनी शेवटी लिहिले, "दादा, आजच्या दिवशी तुझं नसणं मनाला चटका लावून जातं. आम्हा सगळ्या बहिणींना तुझी किती आठवण येतेय, हे शब्दांत सांगणंही कठीण आहे. तू आमच्या मनात कायम आहेस आणि कायम राहशील."