बातमी ऐका (Marathi Voice Reader)
पुणे : दिवाळीच्या आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणातच पुण्यात एक धक्कादायक घटना घडली. दिवाळीच्या फटाक्यांमुळे सुरु झालेल्या किरकोळ वादाचं रूपांतर भयंकर मारहाणीत झालं. वडिलांना मारहाण होत असल्याचं पाहून २१ वर्षीय लेक भांडण सोडवण्यासाठी धावत आली. मात्र, तिच्यासोबतच भयंकर घडलं. तरुणीच्या डोक्यात धारदार शस्त्रानं वार करण्यात आला. या हल्ल्यात ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना पुण्यातील नाना पेठ परिसरात घडली.
याप्रकरणी तरुणीचे वडील नितीन साळवे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यात विनायक अतिश कांबळे (२६) आणि आर्यन विजय शिंदे (१८) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच संदेश संजय जाधव (३०) आणि त्याच्या साथीदारांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन साळवे रिक्षाचालक आहेत. दिवाळीनिमित्त ते आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. यानंतर ते पत्नी आणि मुलीसह घरी परतत होते. त्यावेळी त्यांच्या इमारतीत राहणारे संजय जाधव आणि त्यांचे जावई आकाश ऊर्फ ऋषी उबाळे रस्त्यावर फटाके फोडत होते. यावेळी उबाळे यांनी लावलेल्या फटाक्यावरून साळवे यांच्या रिक्षाचं चाक गेलं आणि वादाला सुरूवात झाली. यात उबाळे यांनी साळवे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. शेवटी हा वाद मिटला आणि साळवे आपल्या घरी गेले. मात्र, ९ नोव्हेंबरला मध्यरात्री दीडच्या सुमारास हा वाद पुन्हा उफाळून आला. नितीन साळवे हे होप हॉस्पिटलजवळ थांबले असताना संदेश जाधव आणि त्याचे मित्र तिथे आले. फटाक्यांवरून झालेल्या जुन्या वादाचा राग काढत त्यांनी साळवे यांना पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली.
ही बाब समजताच साळवे यांची पत्नी, दोन्ही मुली आणि भाचा धावतच तिथे पोहोचले. इतक्यात विनायक कांबळे याने धारदार शस्त्राने साळवे यांच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वडिलांना वाचवण्यासाठी आकांक्षा मध्ये आली आणि तिच्या डोक्याला शस्त्राचा वार लागला. यात तिच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि ती बेशुद्ध पडली. आकांक्षा जखमी झाल्याचे पाहताच हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.