आमदार संजयभाऊ देरकर यांच्या उपस्थितीत सोसायटी अध्यक्षांचा शाल-श्रीफळ देऊन गौरव; खातेदारांच्या मागणीलाही प्रतिसाद
सुरेश पाचभाई | मारेगाव
मारेगाव : दिवाळी सणाच्या निमित्ताने यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मारेगाव शाखेत १२ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. बँकेच्या मारेगाव तालुका गटातून संचालकपदी निवड झालेल्या किरणताई संजयभाऊ देरकर यांच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमाला वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयभाऊ देरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
ग्रामीण भागातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरांना महत्त्व देत तसेच खातेदारांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. ग्रामीण संस्कृतीचा सन्मान, खातेदारांच्या भावना आणि सर्वधर्मीयांचा विश्वास जपण्याची भूमिका नवनिर्वाचित संचालिका किरणताई देरकर यांनी व्यक्त केली.
लक्ष्मीपूजनाच्या कार्यक्रमानिमित्त बँकेच्या परिसरात उत्सवी वातावरण पाहायला मिळाले. सहकार क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये किरणताई देरकर यांच्या संचालकपदी निवडीबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला.
यावेळी मारेगाव तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संलग्न विविध सोसायटीच्या अध्यक्षांचा आमदार संजयभाऊ देरकर यांच्या उपस्थितीत शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या योगदानाची दखल घेत हा गौरव सोहळा पार पडला.
कार्यक्रमाला अनिल पाटील देरकर, वसंतराव आसुटकर, गजानन पाटील किन्हेकर, पुरुषोत्तम बुटे यांच्यासह सहकार क्षेत्रातील मान्यवर, विविध सोसायटीचे अध्यक्ष व उपस्थित नागरिक सहभागी झाले होते.
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मारेगाव शाखा ग्रामीण भागातील शेतकरी, व्यापारी, शेतमजूर व विविध समाजघटकांतील नागरिकांसाठी महत्त्वाची आर्थिक सेवा देणारी शाखा आहे. त्यामुळे खातेदारांच्या भावना आणि ग्रामीण भागातील परंपरांचा सन्मान राखण्याच्या दृष्टीने लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
किरणताई संजयभाऊ देरकर यांच्या संचालकपदी निवडीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेला लक्ष्मीपूजन व सहकार क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा उपस्थितांसाठी विशेष ठरला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने बँक, खातेदार आणि सहकार क्षेत्रातील पदाधिकारी यांच्यातील संवाद व परस्पर विश्वास अधोरेखित झाला.