Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा:मित्रपक्षांतच वाद, विकासाच्या दाव्यांवर आरोप-प्रत्यारोप; पाणी योजना रखडण्याचे खापर खैरेंवर

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर दिव्य मराठी डिजिटलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा’ या टॉक शोला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या या चर्चासत्रांमधून स्थानिक राजकारणासोबतच नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेले प्रश्न थेट समोर येत आहेत. प्रभाग क्रमांक 2 मध्ये झालेल्या चर्चासत्रात राजकीय आरोप-प्रत्यारोप, विकासकामांचे दावे आणि वास्तव यावर सविस्तर चर्चा झाली. विशेष म्हणजे, या चर्चेत सत्ताधारी महायुतीमधील घटकपक्ष एकमेकांवरच तुटून पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. या टॉक शोदरम्यान भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील इच्छुक उमेदवार एकमेकांची उणीदुणी काढण्यात अधिक व्यस्त असल्याचे स्पष्टपणे जाणवले. दोन्ही पक्ष सध्या महायुतीचा भाग असले तरी स्थानिक पातळीवर मात्र स्पर्धा तीव्र असल्याचे या चर्चेतून समोर आले. जुन्या चार वार्डांचे एकत्रीकरण करून एक मोठा प्रभाग तयार करण्यात आल्याने, पूर्वीचे सर्व नगरसेवक आपापल्या कार्यकाळातील विकासकामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले. प्रत्येकाने ‘आमच्याच काळात विकास झाला’ असा दावा केला, मात्र मित्रपक्षातीलच नगरसेवकांवर विकासकामे अपुरी ठेवल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यामुळे नागरिकांसमोर नेमके कोणाचे दावे खरे, हा प्रश्न उभा राहिला.

या चर्चेत शहर विकासाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. राजेंद्र दाते पाटील यांनी सत्ताधारी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी समांतर जलवाहिनी, भूमिगत गटार योजना, स्मार्ट सिटी योजना, सिडकोची घरे फ्री होल्ड करणे आणि शहराला मुबलक पाणीपुरवठा यांसारख्या महत्त्वाच्या योजनांची उदाहरणे देत, या योजनांची केवळ घोषणा झाली असून प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप केला. इतकेच नव्हे, तर या योजनांबाबत सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेची कागदपत्रे त्यांनी उपस्थितांसमोर दाखवली. सत्ताधाऱ्यांनी विकासाची स्वप्ने दाखवून नागरिकांची फसवणूक केली असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कामगिरी दिसत नसल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी त्यांनी महायुतीतील घटकपक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेवर महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोपही केला.

काँग्रेसकडून करण्यात आलेल्या या आरोपांना माजी नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामांना सुरुवात झाली होती. पाणीपुरवठा, रस्ते, पायाभूत सुविधा अशा अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना गती मिळाली होती. मात्र, मधल्या काळात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने या कामांना स्थगिती दिली. या ‘ब्रेक’मुळे अनेक विकासकामे रखडली आणि त्याचा फटका थेट नागरिकांना बसला, असा आरोप त्यांनी केला. आता पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेत आल्याने ही सर्व कामे वेगाने सुरू झाली असून लवकरच शहरवासीयांना मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध होईल, असा दावा त्यांनी केला. राजगौरव वानखेडे यांनी पुढे सांगितले की, शहरात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे झाली असून प्रभाग क्रमांक 2 मध्येही रस्ते, ड्रेनेज, स्ट्रीटलाइट्स यांसारख्या पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी कामे अपुरी वाटत असतील, तर त्यामागे निधीअभावी आणि प्रशासकीय अडचणी कारणीभूत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सत्ताधारी पक्षावर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप निराधार असून, विरोधकांकडे स्वतःची कामगिरी दाखवण्यासारखी काहीच नसल्याने ते केवळ आरोपांच्या आधारे राजकारण करत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

शिवसेनेचे उपशहर प्रमुख विशाल आहेर पाटील यांनीही या चर्चेत सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी वार्डातील विविध समस्यांचा आढावा घेत, अजूनही अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचे मान्य केले. नागरिकांना भेडसावणाऱ्या छोट्या-मोठ्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्या सोडवण्यासाठी आगामी काळात सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. विशेषतः श्री स्वामी समर्थ केंद्राजवळील सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न उपस्थित करत, या समस्येचा पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यासोबतच, वार्डातील युवकांसाठी रोजगाराभिमुख योजना राबवण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत भदाणे पाटील यांनी शिवसेनेवर थेट आरोप केले. शिवसेना नगरसेवकांच्या कार्यकाळात वार्डात अपेक्षित विकासकामे झाली नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे नागरिकांना आजही पाणी, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. मयूर नगर आणि सुदर्शन नगर परिसरातील नागरिकांच्या समस्या गंभीर असून त्याकडे तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. काही ठिकाणी असुरक्षित स्थिती निर्माण झाली असून परिसरात ‘मौत का कुवाँ’ उभा राहिल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

भाजपकडून करण्यात आलेल्या या आरोपांना शिवसेनेच्या माजी नगरसेविका स्वाती किशोर नागरे यांनी सडेतोड उत्तर दिले. त्यांनी सांगितले की, त्यांच्या कार्यकाळात वार्डामध्ये अनेक महत्त्वाची विकासकामे करण्यात आली आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा यांसाठी सातत्याने पाठपुरावा केला गेला असल्याचा त्यांनी दावा केला. नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही 24 तास उपलब्ध राहिलो असून, आजही लोकांच्या प्रश्नांसाठी तत्पर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही समस्या अद्याप शिल्लक असतील, तर आगामी काळात त्या निश्चितपणे सोडवण्यात येतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

माजी नगरसेवक भाऊसाहेब ताठे यांनी आपल्या कार्यकाळात अनेक विकास कामे केले असल्याचा दावा केला. मात्र, यावेळी त्यांनी सांगिलेली काही कामे ही शिवसेना गटातील पदाधिकाऱ्यांनी खोडून काढली. ही कामे माजी नगरसेविका रजनी जोशी यांच्या कार्यकाळात झाली असून आम्ही त्याचे साक्षीदार असल्याचा दावा देखील त्यांनी केला. त्यामुळे भाजपचे भाऊसाहेब ताठे विरुद्ध शिवसेनेचे पदाधिकारी असा वाद पाहायला मिळाला. चंद्रकांत खैरे आणि शिवसेना ठाकरे पक्षावर गंभीर आरोप या चर्चासत्रात शहरातील पाणीप्रश्नावरून माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर गंभीर आरोप करण्यात आले. भाजप तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी समांतर जलवाहिनी योजनेसाठी उद्धव ठाकरे गटातील वरिष्ठ नेते जबाबदार असल्याचा आरोप केला. या योजनेमुळे शहरातील पाणीप्रश्न सुटण्याऐवजी अधिक गुंतागुंतीचा झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे नागरिकांना वर्षानुवर्षे पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. संपूर्ण योजनेची चौकशी होणे आवश्यक या मुद्द्यावर काँग्रेसचे राजेंद्र दाते पाटील यांनीही आपली भूमिका मांडली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, समांतर जलवाहिनी योजनेत भ्रष्टाचार झाला असून तो युती सरकारच्या काळातच झाला आहे. केवळ एकाच पक्षावर दोष ढकलून चालणार नाही, तर या संपूर्ण योजनेची चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. पाणीप्रश्नासारखा मूलभूत विषय राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये अडकून राहिला असून, त्याचा फटका थेट सामान्य नागरिकांना बसत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विकासकामांचे श्रेय कोणाचे, यावरून वाद ‘लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा’ या टॉक शोमधून एक गोष्ट प्रकर्षाने समोर आली, ती म्हणजे नागरिकांचे प्रश्न आणि राजकीय श्रेयवाद यातील संघर्ष. प्रत्येक पक्ष आपापली कामगिरी मोठ्या प्रमाणावर मांडत असला, तरी प्रत्यक्षात नागरिकांना अजूनही मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत असल्याचे चित्र आहे. चार वार्डांचा एक प्रभाग झाल्याने विकासकामांचे श्रेय कोणाचे, यावरून वाद सुरू असले तरी नागरिकांना मात्र ठोस उपाययोजना हव्या आहेत. राजकीय मतभेद बाजूला ठेवून नागरिकांच्या प्रश्नांवर एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. निवडणुकीपूर्वीच अनेक मुद्दे चर्चेत छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी राजकीय धुसफूस अधिक तीव्र होताना दिसत आहे. ‘लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा’ या मंचामुळे राजकीय नेत्यांना थेट नागरिकांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत असून, यामुळे निवडणुकीपूर्वीच अनेक मुद्दे चर्चेत आले आहेत. मात्र, या चर्चेचा निष्कर्ष नागरिकांच्या हितासाठी कितपत उपयोगी ठरतो, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. सध्या तरी मित्रपक्षांतील आरोप-प्रत्यारोप, विरोधकांचे गंभीर आरोप आणि विकासाच्या दाव्यांमुळे छत्रपती संभाजीनगरची मनपा निवडणूक अधिकच रंगतदार होत चालली आहे. प्रभाग सामाजिकदृष्ट्या मिश्र स्वरूपाचा प्रभाग क्रमांक 2 ची एकूण लोकसंख्या 36,131 इतकी आहे. हा प्रभाग सामाजिकदृष्ट्या मिश्र स्वरूपाचा असून विविध समाजघटकांचे प्रतिनिधित्व येथे दिसून येते. अनुसूचित जातींची लोकसंख्या तुलनेने लक्षणीय असल्यामुळे सामाजिक न्याय, आरक्षण, शिक्षण, रोजगार आणि मूलभूत सुविधा यासारख्या प्रश्नांना या प्रभागात विशेष महत्त्व आहे. प्रभागात नेमका कोणता परिसर कोणत्याही एका समाजाचे संपूर्ण बहुमत नसल्यामुळे हा प्रभाग राजकीयदृष्ट्या संतुलित आणि स्पर्धात्मक आहे. सर्व समाजघटकांना सोबत घेणारी समावेशक विकासाची भूमिका येथे प्रभावी ठरण्याची शक्यता अधिक आहे. या प्रभागात भारतनगर, वानखेडेनगर, होनाजीनगर, पटेल प्लॅनेट, IIHM-A हॉस्टेल परिसर, मुजफ्फरनगर, यादवनगर, नवजीवन कॉलनी, नवनाथनगर भाग, एम.एस.ई.बी. पॉवर हाऊस, मयूरनगर, दिपनगर, सुदर्शननगर, भागशः, गजानननगर भागशः, रोझेबाग, डी-मार्ट, भारतमातानगर एन-12, छत्रपती नगर एन-12, सारा वैभव, महमूदपुरा, फरहत नगर, N13 चा काही भागाचा समावेश आहे. प्रभागातील चार वार्डात या आधी असलेले नगरसेवक आणि पक्ष

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!