बातमी ऐका (Marathi Voice Reader)
बीड : गट शेती ही सध्याच्या काळात शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आणि प्रभावी शेती पद्धत ठरत आहे. वाढता शेती खर्च, मजुरांची कमतरता, निविष्ठांच्या वाढत्या किमती आणि बाजारपेठेतील अनिश्चितता यामुळे एकट्याने शेती करणे अनेकदा आव्हानात्मक ठरते. अशा परिस्थितीत काही शेतकरी एकत्र येऊन ठराविक समूह तयार करून शेती केल्यास उपलब्ध साधनांचा योग्य वापर करता येतो. त्यामुळे शेतीतील विविध कामांचे नियोजन अधिक चांगल्या पद्धतीने करता येऊन उत्पादन वाढवण्यास मदत होते. गटाच्या माध्यमातून शेती केल्याने शेतकऱ्यांमधील समन्वय वाढतो आणि एकमेकांच्या अनुभवाचा फायदा देखील मिळतो.
गट शेतीचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे जोखीम कमी करणे, खर्च कमी करणे आणि उत्पादनामध्ये वाढ करणे हा आहे. शेतकरी एकत्रितपणे बियाणे, खते, कीटकनाशके आणि इतर निविष्ठांची खरेदी केल्यास मोठ्या प्रमाणात माल घेतल्यामुळे तुलनेने कमी दरात निविष्ठा उपलब्ध होऊ शकतात. तसेच शेतीची मशागत, पेरणी, फवारणी आणि काढणी यांसारख्या कामांचे सामूहिक नियोजन करता येते. त्यामुळे वेळ आणि पैशांची बचत होण्यास मदत होते. गटातील शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेली यंत्रसामग्री किंवा इतर साधने सामायिक पद्धतीने वापरता येत असल्याने अतिरिक्त खर्चही कमी होऊ शकतो. याबाबत बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील कृषी सहाय्यक प्रतीक्षा ससाने यांनी अशी माहिती दिली.
एकत्रित शेतीमुळे मजुरांची कमतरता भासण्याची शक्यताही कमी होते. एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात महत्त्वाचे काम सुरू असताना गटातील इतर सदस्यांनी सहकार्य केल्यास काम वेळेत पूर्ण करता येते. विशेषतः पेरणी, आंतरमशागत, फवारणी आणि काढणीच्या काळात मजुरांची मोठी गरज असते. मात्र एकाच वेळी अनेक शेतकऱ्यांची कामे असल्यामुळे मजूर मिळणे कठीण होते. गट शेतीमध्ये उपलब्ध मनुष्यबळाचे नियोजन करून एकामागून एक कामे पूर्ण करता येतात. यामुळे पिकांच्या महत्त्वाच्या अवस्थेत कामे रखडण्याची शक्यता कमी होते.
गट शेतीचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे उत्पादनाच्या विक्रीमध्ये शेतकऱ्यांची सामूहिक ताकद वाढते. प्रत्येक शेतकऱ्याने स्वतंत्रपणे कमी प्रमाणात शेतमाल विकण्याऐवजी गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात माल एकत्रित केल्यास बाजारपेठेत चांगली सौदेबाजी करता येऊ शकते. एकसारख्या दर्जाचा माल तयार करण्यासाठी गटातील शेतकरी एकत्रित नियोजन करू शकतात. त्यातून बाजारपेठेच्या मागणीनुसार उत्पादन घेणे, योग्य वेळी माल विक्री करणे आणि वाहतुकीचा खर्च कमी करणे शक्य होते. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चासोबतच विक्री व्यवस्थापनातही फायदा मिळू शकतो.
आजच्या बदलत्या शेती व्यवस्थेत शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीसोबत सामूहिक शेतीकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. गटातील शेतकरी एकमेकांना सहकार्य करून उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर करू शकतात. निविष्ठांची सामूहिक खरेदी, मजुरांचे नियोजन, यंत्रांचा सामायिक वापर, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि सामूहिक विक्री यामुळे शेती अधिक नियोजनबद्ध होण्यास मदत होते. त्यामुळे उत्पादन वाढवण्याबरोबरच खर्च आणि जोखीम कमी करण्याची संधी शेतकऱ्यांना मिळू शकते. भविष्यात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट शेतीला प्रोत्साहन दिल्यास शेती अधिक सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर करण्यास मदत होऊ शकते.