राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुन्हा एकदा पेपरफुटीच्या वादात अडकली आहे. ठाणे जिल्ह्यात उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका आधीच बाहेर आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली. या पार्श्वभूमीवर उद्या होणारी परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, शिक्षण विभागाकडून याबाबत अधिकृत आदेश जाहीर होण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यातून पेपरफुटी झाल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे देशभरात नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणानंतर आता आणखी एका महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 3 जण पोलिसांच्या ताब्यात TET पेपर फुटीप्रकरणी पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा (TET) चा पेपर लीक करणाऱ्या टोळीविरुद्ध भिवंडीत कारवाई झाली. कोनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी सापळा लावून 3 जणांना ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी भिवंडीतील कोनगाव पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंद होत आहे. त्यानंतर आरोपींवर कारवाई केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परीक्षेचे निवेदन, परीक्षा रद्द झाल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवार, दि. 28 जून 2026 रोजी राज्यभरातील 1,028 केंद्रांवर आयोजित करण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 2026 पुढे ढकलण्यात आली असल्याचे परीक्षा परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे. परीक्षा पारदर्शकत होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत टीईटी परीक्षा सुरक्षित व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तथापि, दि. 27 जून 2026 रोजी पहाटे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार भिवंडी येथे काही व्यक्तींना टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत माहिती असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानुसार भिवंडी पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकून तपासणी केली. या प्रकरणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी बोलावून पडताळणी करण्यात आली. तपासादरम्यान संबंधित व्यक्तींकडे आढळलेल्या काही प्रश्न आणि शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) जून २०२६च्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न समान असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने पार पडावी, तसेच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याने दि. 28 जून 2026 रोजी नियोजित टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आला आहे. टीईटी परीक्षेच्या नव्या तारखेसह इतर अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे परिषदेकडून कळविण्यात आले आहे. सरकारकडूनच पेपर फोडले जात आहेत; टीईटी पेपरफुटीनंतर अंबादास दानवे कडाडले या पेपरफुटीवर तीव्र संताप व्यक्त करत ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी महायुती सरकारला धारेवर धरले आहे. दानवे म्हणाले, “या संपूर्ण पेपरफुटीमध्ये सरकारचाच सहभाग आहे. या सरकारला एक साधी टीईटी परीक्षा देखील नीट घेता येत नाही. प्रत्येक वेळी सरकारकडूनच पेपर फोडले जात आहेत आणि सध्या संपूर्ण राज्य ‘भगवान भरोसे’ सुरू आहे.” सरकारच्या भोंगळ कारभारावर टीका करताना दानवे पुढे म्हणाले, “एक गरीब विद्यार्थी परीक्षेसाठी वर्षाभरापासून दिवस-रात्र तयारी करतो. पण परीक्षेच्या अवघ्या दोन दिवस आधी जर असे पेपर फुटत असतील, तर विद्यार्थ्यांमधील परीक्षा देण्याचा उत्साह पूर्णपणे संपून जातो. याचा थेट परिणाम त्यांच्या मानसिकतेवर आणि निकालावर होतो.” ऐन परीक्षेच्या तोंडावर झालेल्या या घोळामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांमधून आणि पालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ‘TET पेपरही फुटला… महायुतीचे पेपरफुटी मॉडेल कायम’; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात पेपरफुटी प्रकरणावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. परीक्षा सुरू होण्याच्या अवघ्या एक दिवस आधी प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे परीक्षा रद्द करण्याची वेळ आल्याचा उल्लेख करत त्यांनी, “TET पेपरही फुटला… महायुतीचे पेपरफुटी मॉडेल कायम!” अशा शब्दांत सरकारवर निशाणा साधला आहे. ‘महाराष्ट्राची ओळख पेपरफुटीची झाली, ही लाजिरवाणी बाब’ विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्राची ओळख ही शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांमधील यशामुळे होती. मात्र, आज दुर्दैवाने महाराष्ट्राची ओळख पेपरफुटीमुळे होत असून ही राज्यासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. त्यांनी म्हटले की, NEET पेपरफुटीचे धागेदोरे महाराष्ट्रात सापडले होते. आता ठाण्यात टीईटीचा पेपर परीक्षा होण्याच्या अवघ्या एक दिवस आधी फुटल्याने परीक्षा रद्द करण्याची वेळ आली. लाखो विद्यार्थ्यांनी अनेक महिने रात्रंदिवस अभ्यास करून परीक्षेची तयारी केली होती. मात्र, काही भ्रष्ट प्रवृत्तीमुळे त्यांच्या मेहनतीवर एका क्षणात पाणी फिरल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ‘ही केवळ पेपरफुटी नाही, लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची चोरी’ वडेट्टीवार यांनी या घटनेला केवळ पेपरफुटी न म्हणता, “ही लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची, त्यांच्या कष्टांची आणि भविष्याची चोरी आहे,” असे म्हटले आहे. सरकारी भरती परीक्षा असो किंवा पात्रता परीक्षा, वारंवार पेपरफुटी होत असताना सरकार मात्र नेहमीप्रमाणे चौकशीच्या घोषणा करण्यात व्यस्त असल्याची टीका त्यांनी केली. प्रत्येक वेळी दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले जाते, मात्र त्यानंतर पुन्हा दुसऱ्या परीक्षेचा पेपर फुटतो, यावरून दोषींना कायद्याचा धाक राहिलेला नसल्याचे किंवा त्यांना कुणाचे तरी संरक्षण मिळत असल्याचे दिसून येते, असा आरोप त्यांनी केला. ‘सरकारने नैतिक जबाबदारी स्वीकारावी’ राज्यातील युवक आधीच बेरोजगारीच्या संकटाशी झुंज देत असल्याचे सांगत वडेट्टीवार यांनी महायुती सरकारने या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी केली आहे. तसेच, टीईटीचा पेपर नेमका कसा फुटला, त्यामागे कोणते रॅकेट कार्यरत आहे, त्याला राजकीय किंवा प्रशासकीय संरक्षण आहे का, याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. ‘सूत्रधारांनाही कठोर शिक्षा झाली पाहिजे’ केवळ लहान-मोठ्या दलालांना अटक करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न न करता, या संपूर्ण रॅकेटमागील सूत्रधार आणि त्यांना संरक्षण देणाऱ्यांनाही कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 4.28 लाख विद्यार्थ्यांना फटका; पुण्यात सर्वाधिक उमेदवार यंदाच्या महाटीईटी परीक्षेसाठी राज्यभरातून 4 लाख 28 हजार 122 उमेदवारांनी नोंदणी केली होती. यामध्ये पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक 45 हजार 562 उमेदवारांचा समावेश आहे. परीक्षा रद्द झाल्याने अनेक महिन्यांपासून तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांच्या मेहनतीवर पाणी फिरले असून, शिक्षकांमध्ये आणि पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 18 हजार AI कॅमेरे, बायोमेट्रिक… तरीही पेपरफुटी विशेष म्हणजे, यंदाची परीक्षा पारदर्शक करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली होती. राज्यभरात पेपर क्रमांक 1 साठी 701 आणि पेपर क्रमांक 2 साठी 1,028 अशी एकूण 1,729 परीक्षा केंद्रे उभारण्यात आली होती. प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली होती. गैरप्रकार रोखण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर 18 हजार एआय-आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. राज्य व जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षातून थेट निरीक्षण केले जाणार होते.
