हिवरा रोडवरील बंधारा पुलाची दुरवस्था

खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका, शिवसेना (उबाठा)चा आंदोलनाचा इशारा

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील मार्डी–हिवरा मार्गावरील बंधारा पुलाची दुरवस्था झाल्याने पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून, त्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन दुरुस्ती न केल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मारेगाव तालुका प्रमुख पुरुषोत्तम बुटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मार्डी–हिवरा मार्गावरील बंधारा पुलाच्या बांधकामात त्रुटी राहिल्याने पुलावर मोठा उंचवटा निर्माण झाला आहे. त्याचबरोबर पावसाच्या पाण्यामुळे पुलालगत चिखलयुक्त खोल खड्डे पडले असून, वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना वाढल्या असून, काही जण किरकोळ तर काही गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

हा मार्ग शेतकरी, नागरिक तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी महत्त्वाचा असल्याने या रस्त्यावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. शेतातील उपकॅनलकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांनाही मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा)चे तालुका प्रमुख तथा माजी उपसरपंच पुरुषोत्तम बुटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना निवेदन देत तातडीने पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

“या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात आहे.प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे भविष्यात कोणतीही जीवितहानी अथवा गंभीर अपघात झाल्यास त्यास सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित अधिकारी सर्वस्वी जबाबदार राहतील,” असा इशारा त्यांनी निवेदनातून दिला.

लोकशाही मार्गाने आणि कायद्याच्या चौकटीत राहून ही अंतिम चेतावणी देण्यात आल्याचे सांगत, पुलाची तातडीने दुरुस्ती न झाल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही पुरुषोत्तम बुटे यांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासन या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करते की नाही, याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे..

Leave a Comment

error: Content is protected !!