बातमी ऐका (Marathi Voice Reader)
मुंबई: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 15 डब्यांच्या लोकल गाड्या सामावून घेण्यासाठी टिटवाळा स्थानकात प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यात येत आहे. या कामासाठी 28 ऑगस्टपासून ते 12 सप्टेंबरपर्यंत मध्यरात्री 5-6 तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यानुसार आज मध्यरात्री 23.30 ते पहाटे 5.10 वाजेपर्यंत अप आणि डाऊन नॉर्थ ईस्ट मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही गाड्या बंद राहणार असून मुंबईकरांना वेळापत्रक पाहून प्रवासाचे नियोजन करावे लागेल.
टिटवाळा-कसारा लोकल सेवा बंद
टिटवाळा आणि कसारा स्थानकांदरम्यान उपनगरीय लोकल सेवा बंद राहील. टिटवाळ्यापर्यंत धावणाऱ्या काही लोकल सेवा आसनगावपर्यंत वाढवण्यात येतील, तर टिटवाळ्याहून सुटणाऱ्या काही सेवा आसनगावहून सुरू केल्या जातील. तर ब्लॉकमुळे CSMT-टिटवाळा, CSMT-कसारा, ठाणे-टिटवाळा, कुर्ला-कल्याण, CSMT-आसनगाव यासह काही लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच टिटवाळा-CSMT, टिटवाळा-परळ, टिटवाळा-ठाणे आणि आसनगाव-ठाणे मार्गावरील काही अप सेवा देखील रद्द राहतील.
Mumbai: तासाचा प्रवास अवघ्या 10 मिनिटांत होणार, 30 KM चा वळसा वाचणार, मुंबईत मास्टरप्लॅनच्या कामाला वेग
सीएसएमटी कसारा शेवटी लोकल कधी?
बुधवारी ब्लॉकपूर्वीची CSMT हून कसाऱ्याकडे जाणारी शेवटची लोकल 22.47 वाजता असेल. तर कसाऱ्याहून CSMT कडे जाणारी शेवटची लोकल 22.00 वाजता सुटेल. तसेच ब्लॉकनंतर CSMT हून कसाऱ्याकडे जाणारी पहिली लोकल पहाटे 4.19 वाजता सुटणार आहे.
ठाणे आणि कल्याणपर्यंतच काही लोकल
मध्यरात्री घेण्यात येणाऱ्या या ब्लॉकमुळे काही लोकलच्या फेऱ्या त्यांच्या नियमित स्थानकाऐवजी ठाणे किंवा कल्याणपर्यंतच चालवल्या जातील. कल्याणहून CSMT कडे जाणाऱ्या 16.26 आणि 22.06 वाजताच्या लोकल ठाण्यापर्यंत धावतील. तसेच 21.08 वाजता डोंबिवलीहून सुटणारी CSMT लोकलही ठाण्यापर्यंतच चालवली जाईल.
एसी लोकलच्या फेऱ्यांत बदल
दादर-टिटवाळा आणि CSMT-टिटवाळा मार्गावरील काही वातानुकूलित लोकल ठाण्यापर्यंतच चालवण्यात येतील. तसेच CSMT-टिटवाळा मार्गावरील 09.27 आणि 19.46 वाजताच्या सेवा कल्याणपर्यंतच चालवल्या जातील. टिटवाळा-CSMT च्या काही अप सेवा ठाणे किंवा कल्याण येथून सुरू करण्यात येतील.
मेल-एक्सप्रेस गाड्यांना फटका
काही मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीवरही या ब्लॉकचा परिणाम होणार आहे. गोरखपूर-दादर एक्सप्रेस वासिंद येथे रात्री 2.27 ते सकाळी 5.00 या वेळेत नियंत्रित केली जाईल. तर अयोध्या कॅन्ट-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस आटगाव येथे पहाटे 2.35 ते 4.55 या कालावधीत नियंत्रित केली जाईल.
या गाड्या उशिरा पोहोचणार
हावडा-सीएसएमटी मेल एक्सप्रेस, शालीमार-एलटीटी एक्सप्रेस आणि नागपूर-मडगाव एक्सप्रेस या गाड्या त्यांच्या गंतव्यस्थानी 10 ते 15 मिनिटे उशिरा पोहोचण्याची शक्यता आहे. काही उशिराने धावणाऱ्या किंवा नंतर जाहीर होणाऱ्या विशेष गाड्यांच्या वेळापत्रकातही परिस्थितीनुसार बदल करण्यात येणार आहेत.
दरम्यान, मुंबई 15 डब्यांच्या गाड्या सुरू करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. सुरक्षितता आणि देखभाल कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येत आहे. प्रवाशांनी या काळात सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.