बातमी ऐका (Marathi Voice Reader)
सोलापूर : सध्याच्या काळात तरुण नोकरीच्या शोधात शहरांकडे धाव घेत असताना, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील संतोष पाटील या तरुणाने मात्र वेगळी वाट निवडली आहे. बीएच्या तिसऱ्या वर्षापर्यंत शिक्षण झालेल्या संतोष यांनी नोकरीच्या मागे न धावता स्वतःच्या शेतीत नवनवीन प्रयोग करत केळी लागवडीतून खर्च वजा जाता 3 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
संतोष यांनी दीड एकर क्षेत्रात 6 बाय 5 फूट अंतरावर सुमारे 2 हजार केळीच्या रोपांची लागवड केली. लागवडीपूर्वी जमिनीची उत्तम मशागत करून, बेड तयार केले आणि त्यात भरपूर शेणखत भरले. केळीच्या रोपांची जसजशी वाढ होते, तसतसे योग्य पाण्याचे नियोजन आणि दर आठवड्याला पिकांची नियमित काळजी घेत फवारण्या केल्या. यासाठी त्यांना सुमारे 1 लाख रुपयांचा खर्च आला.
पिकाची उत्तम निगा राखल्याने थेट शेतातूनच पुणे येथील मार्केटमध्ये केळीची विक्री झाली. गेल्या तीन वर्षांपासून ते यशस्वीरीत्या केळीची शेती करत असून, सर्व खर्च वजा जाता त्यांना सुमारे 3 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळत आहे.
आपल्या या यशानंतर संतोष पाटील यांनी इतर तरुणांना मोलाचा सल्ला दिला आहे. केवळ नोकरीच्या मागे न धावता तरुणांनी शेती किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. योग्य नियोजन आणि कष्टाच्या जोरावर शेतीतूनही नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न मिळवता येते, असे आवाहन या तरुण शेतकऱ्याने केले आहे.