बातमी ऐका (Marathi Voice Reader)
सोलापूर : शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी दुसऱ्याकडे काम करण्याऐवजी स्वबळावर शेतीचा मार्ग निवडत सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथील श्रेयस थोबळे या तरुण विद्यार्थ्याने आदर्श निर्माण केला आहे. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच श्रेयसने अवघ्या पाच गुंठ्यात हिरव्या मिरचीची यशस्वी लागवड करून 2 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवण्याची किमया साधली आहे.
श्रेयसने सुरुवातीला स्वतःच्या शेतात पारंपरिक पद्धतीला छेद देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. लागवडीपूर्वी जमिनीची व्यवस्थित नांगरणी करून बेड तयार केले. त्यावर ठिबक सिंचन बसवून मल्चिंग पेपरचा वापर केला. या पाच गुंठ्याच्या क्षेत्रात त्याने तब्बल 3 हजार हिरव्या मिरचीच्या रोपांची यशस्वी लागवड केली.
योग्य नियोजन आणि वेळेवर केलेल्या देखभालीमुळे लागवडीपासून जवळपास अडीच महिन्यांनंतर मिरचीचे उत्पादन सुरू झाले. सध्या दर तीन ते चार दिवसांनी 60 ते 70 किलो हिरव्या मिरचीचा तोडा निघत आहे. बाजारात हिरव्या मिरचीला मिळणारा चांगला भाव आणि दर्जेदार उत्पादनामुळे या पिकातून उत्तम उत्पन्न मिळत आहे.
विशेष म्हणजे, पाच गुंठ्यात मिरचीची लागवड करण्यासाठी श्रेयसला सुमारे 15 हजार रुपये खर्च आला. हा संपूर्ण खर्च वजा जाता उर्वरित हंगामात तब्बल 2 लाख रुपयांपर्यंतचे निव्वळ उत्पन्न मिळाले आहे.
कष्ट, आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आणि जिद्दीच्या जोरावर श्रेयसने कॉलेजचे शिक्षण सांभाळत स्वतःच्या शिक्षणाचा खर्च स्वतः उचलला आहे. आजच्या बेरोजगारीच्या काळात इतरांवर अवलंबून न राहता शेतीतून रोजगाराची नवी वाट दाखवणाऱ्या श्रेयस थोबळेचे परिसरातून कौतुक होत आहे.