बातमी ऐका (Marathi Voice Reader)
मुंबई: मध्य रेल्वेवरील प्रवाशांचे ब्लॉक हाल संपत नसल्याचे चित्र आहे. आता कसारा-आसनगावदरम्यान तिसरी मार्गिका कार्यान्वित करण्याचं आणि यार्डमधील अप यार्ड मार्गिकेच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी मध्य रेल्वेने 7 ते 18 ऑक्टोबर दरम्यान 12 दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक काळात काही गाड्या रद्द राहणार असून प्रवाशांना वेळापत्रक पाहूनच प्रवासाचं नियोजन करावं लागेल.
तिसरी मार्गिका कार्यान्वित करण्यासाठी कसारा-आसनगाव दरम्यान 12 दिवसांचा ब्लॉक टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार आहे. पहिला टप्पा 7 ते 9 ऑक्टोबरदरम्यान घेण्यात येईल. सात आणि आठ ऑक्टोबरला दुपारी 3.35 ते रात्री 8.35 पर्यंत तर, 9 ऑक्टोबरला मध्यरात्री 12.30 ते पहाटे 5.30 या वेळेत ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक काळात कसारा ते आसनगाव दरम्यानच्या लोकल फेऱ्या पूर्णत: आणि काही लोकल अंशत: रद्द राहतील.
Mumbai Local : प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! गरज असेल तरच रविवारी घराबाहेर पाडा, रेल्वेकडून जम्बो ब्लॉकची घोषणा
या ब्लॉकमध्ये कसारा-खर्डी आणि उंबरमाळी-कसारादरम्यानची ‘अप’ मुख्य मार्गिका आणि ‘डाऊन’ मुख्य मार्गिका, तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक 1, 3, 4 आणि ‘अप’ यार्डाचा देखील समावेश असेल.
नाशिकमार्गे धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये बदल
कसारा-आसनगाव ब्लॉकमुळे नाशिकमार्गे धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्येही बदल करण्यात आले आहेत. गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, अयोध्या कँट-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, पुष्पक एक्स्प्रेस, बलिया-दादर एक्स्प्रेस आणि ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस यांचे इगतपुरी येथे नियमन करण्यात येणार आहे.
कसारा-आसनगाव ब्लॉक काळातील वेळापत्रक
7 आणि 8 ऑक्टोबर रोजीचे बदल
सीएसएमटी येथून कसाऱ्यासाठी सुटणाऱ्या लोकल: दुपारी 1.10, 2.17, 2.46 आणि 4.50 वाजता
कसाऱ्याऐवजी आसनगावहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल: दुपारी 4.12, 4.54, सायंकाळी 5.39, 6.54
ब्लॉकपूर्वी सीएसएमटीहून कसाऱ्यासाठी शेवटची लोकल दुपारी 12.30 वाजता सुटेल. तर कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणारी शेवटची लोकल दुपारी 2.42 वाजता सुटेल. तर ब्लॉकनंतर सीएसएमटीहून कसाऱ्यासाठी पहिली लोकल सायंकाळी 6.28 वाजता सुटेल. कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणारी पहिली लोकल रात्री 8.35 वाजता सुटेल.
या लोकल रद्द
8 ऑक्टोबर रोजी सीएसएमटी-कसारा रात्री 22.47 वाजताची आणि टिटवाळा ठाणे 23.14 वाजताची लोकल रद्द राहील. तर 9 ऑक्टोबर रोजी सीएसएमटी-कसारा 00.08 वाजता आणि कसारा-सीएसएमटी 03.51 वाजताची लोकल रद्द राहील.