Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

राज ठाकरेंनी त्यांचा पक्ष ठाकरे सेनेमध्ये सिरेंडर केला:भाजपमध्ये दाखल होताच संतोष धुरींचा ठाकरे बंधुंवर निशाणा; म्हणाले- उद्धव ठाकरे कोत्या मनाचे नेते

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला बसलेला धक्का आता थेट आरोपांच्या रणधुमाळीत बदलला आहे. भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करताच माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे यांनी आपला पक्ष ठाकरे सेनेसमोर सरेंडर केला आहे, तर उद्धव ठाकरे हे कोत्या मनाचे नेते आहेत, असा गंभीर आरोप करत धुरी यांनी मनसेशी सर्व संबंध तोडल्याची स्पष्ट घोषणा केली. अमित साटम यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशाने केवळ मनसेच नव्हे, तर ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या चर्चांनाही मोठा धक्का दिला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली वेगाने घडत असताना मनसेसाठी परिस्थिती अधिकच बिकट होताना दिसत आहे. कालपर्यंत राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक आणि निष्ठावंत मनसैनिक म्हणून ओळखले जाणारे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी अखेर भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. मात्र हा प्रवेश केवळ पक्षांतरापुरता मर्यादित न राहता, ठाकरे बंधूंवर थेट आरोपांच्या फैरी झाडणारा ठरला आहे. भाजपमध्ये दाखल होताच धुरी यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत मनसेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या उपस्थितीत दुपारी संतोष धुरी यांचा भाजप प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी बोलताना धुरी यांनी स्पष्ट शब्दांत मनसे नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली. राज ठाकरे यांनी त्यांचा पक्ष ठाकरे सेनेमध्ये सरेंडर केला आहे. मनसेची स्वतंत्र ओळखच संपवण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप त्यांनी केला. यासोबतच उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधत, उद्धव ठाकरे हे कोत्या मनाचे नेते आहेत. कार्यकर्त्यांची कदर त्यांच्याकडे नाही, असा घणाघात त्यांनी केला. संतोष धुरी हे यंदाच्या महापालिका निवडणुकीसाठी वॉर्ड क्रमांक 194 मधून इच्छुक होते. मात्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्यातील जागावाटपात हा वॉर्ड उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडे गेल्याने मनसेकडून धुरी यांना उमेदवारी मिळाली नाही. या निर्णयामुळे ते नाराज असल्याची चर्चा काही दिवसांपासून होतीच, मात्र भाजपमध्ये प्रवेश करताना त्यांनी ही नाराजी थेट नेतृत्वावर आरोपांच्या स्वरूपात व्यक्त केली. अप्रत्यक्षपणे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवरही बोट भाजप प्रवेशापूर्वी धुरी यांनी माध्यमांशी संवाद साधताना, तिकीट मिळालं नाही म्हणून मी नाराज आहे, असा प्रश्न नाही. मनसेत माझी कदर झाली नाही, असे स्पष्ट केले होते. आता मात्र भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेच्या निर्णय प्रक्रियेवर टीका करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवरही बोट ठेवलं. या युतीमुळे मनसेचा स्वतंत्र आवाज दडपला गेल्याचा दावा त्यांनी केला. मनसेतील उपेक्षेचा मुद्दा अधोरेखित भाजप नेते नितेश राणे यांच्याशी असलेल्या संबंधांचा उल्लेख करत धुरी यांनी भाजप नेतृत्वाकडून आपल्याला मिळालेल्या सन्मानाची तुलना मनसेतील वागणुकीशी केली. नितेश राणे हे कोकणातील नेते असून ते नेहमी माझ्या संपर्कात होते. काल खास माझ्यासाठी ते सिंधुदुर्गावरून मुंबईत आले, असे सांगत त्यांनी भाजपमधील आपले स्वागत कसे झाले, यावर भर दिला. याच पार्श्वभूमीवर मनसेतील उपेक्षेचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. संदीप देशपांडे यांना डावलले जात असल्याचा दावा राजकीय वाटचालीकडे पाहिल्यास, संतोष धुरी हे अनेक वर्षे दादर परिसरात मनसेसाठी सक्रिय होते. 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांनी मनसेकडून निवडणूक लढवली होती, मात्र पराभव पत्करावा लागला. यंदा ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीमुळे पुन्हा एकदा संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मनसेचे शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांनीही त्यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले, मात्र जागावाटपात वॉर्ड 194 उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्याने ही संधी हुकली. सध्या मनसे-सेना युतीमध्ये संदीप देशपांडे यांनाही डावलले जात असल्याचा दावा धुरी यांनी केला. मनसेला अपेक्षित आणि ताकदीच्या जागा दिल्या नाहीत मनसेला मुंबईत 52 जागा सोडल्याचे सांगितले जात असले, तरी त्यापैकी केवळ सात किंवा आठ जागांवरच विजयाची शक्यता असल्याचा दावा संतोष धुरी यांनी केला आहे. उद्धव ठाकरे गटाने मनसेला अपेक्षित आणि ताकदीच्या जागा दिल्या नाहीत, असा आरोप करत त्यांनी जागावाटपावर नाराजी व्यक्त केली. ज्या ठिकाणी ठाकरे गटाकडे उमेदवारच नव्हते किंवा विद्यमान नगरसेवकाची प्रतिमा खराब झाली होती, अशाच जागा मनसेच्या गळ्यात घातल्याचा आरोप त्यांनी केला आहे. धुरी यांच्या मते, माहीम, दादर, वरळी, शिवडी आणि भांडूप यांसारख्या मराठा मतदारांचा टक्का जास्त असलेल्या भागांमध्ये मनसेला केवळ एका जागेवर समाधान मानायला लावण्यात आले. ठाकरे गटाला ज्या जागा नको होत्या, त्याच जागा मनसेला देण्यात आल्या, असा आरोप त्यांनी केला. संतोष धुरी आणि संदीप देशपांडे हे दोन किल्ले सरेंडर सुरुवातीला प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मनसेला दोन जागा देण्याचे ठरले होते, मात्र प्रत्यक्षात ते पाळले गेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दादरमधील वॉर्ड क्रमांक 190 आणि 192 आपल्याला मिळणार नसल्याचे नितीन सरदेसाईंनी आधीच सांगितल्याचा दावाही धुरी यांनी केला. वॉर्ड क्रमांक 192 अखेर ठाकरे गटाकडे गेल्याने आणि तो वॉर्ड प्रकाश पाटणकर यांच्याकडून काढून घेतल्याने आपल्याला जागावाटपातून पूर्णपणे दूर ठेवण्यात आल्याचा आरोप धुरी यांनी केला. उमेदवारी न मिळाल्याचा राग नसून, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनाही जागावाटपाच्या चर्चेत सामील न केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. वरून, म्हणजे वांद्र्याच्या बंगल्यावरून असा आदेश आला की संतोष धुरी आणि संदीप देशपांडे हे दोन किल्ले सरेंडर करण्यात आले असून ते उमेदवार म्हणून किंवा चर्चेत कुठेही दिसणार नाहीत, असा खळबळजनक दावा धुरी यांनी केला आहे. मनसेचा फडणवीसांवर पलटवार फडणवीस स्वतः असे कार्यकर्ते का नाही तयार करू शकत? फडणवीसांनी याआधीही राजसाहेबांचे आमदार फोडले… आणि स्वतःचे राईट हँड करवून घेतले..दरेकर,कदम…अशी बरीच नाव त्यावेळी होती.. आज माजी नगरसेवक राहिलेल्या संतोष धुरींना दुसरं तिसर कोणी प्रवेश न देत थेट स्वतः प्रवेश दिला…राज ठाकरेंच्या कार्यकर्त्याला इतकं महत्व का.??? कारण त्यांना माहीत आहे,राज ठाकरेंनी घडवलेले नेते,कार्यकर्ते हे सगळ्या लढाया पार करून आलेले असतात,संघर्ष करून आलेले असतात… मुळात त्यांना त्यांच्या स्वतःच्या मनगटावर विश्वास नाही की आपल्याकडून ही असे कार्यकर्ते तयार होतील. अशा शब्दांत मनसेने या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!