बातमी ऐका (Marathi Voice Reader)
सोलापूर : जमिनीचा योग्य अभ्यास आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर केला, तर शेती हा उत्तम नफ्याचा व्यवसाय ठरू शकतो, हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथील प्रगतिशील शेतकरी हणमंत तांबवी यांनी सिद्ध करून दाखवले आहे. हणमंत तांबवी हे गेल्या 10 वर्षांपासून सातत्याने ढोबळी मिरचीची यशस्वी लागवड करत असून त्यातून वर्षाकाठी 6 ते 7 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत.
हणमंत यांनी यंदा आपल्या दोन एकर शेतामध्ये ढोबळी मिरचीची लागवड केली आहे. पिकाची उत्तम वाढ व्हावी आणि पाण्याचा योग्य निचरा व्हावा यासाठी त्यांनी बेड पद्धतीचा वापर केला आहे. ढोबळी मिरचीवर प्रामुख्याने पडणाऱ्या करपा रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्यांनी वेळोवेळी योग्य औषधांची फवारणी करून पिकाचे संरक्षण केले आहे. योग्य नियोजन आणि मेहनतीमुळे त्यांचे पीक सध्या अगदी जोमात आले आहे.
लोकल 18 शी बोलताना हणमंत यांनी सांगितले की, ढोबळी मिरचीच्या लागवडीसाठी एकरी सुमारे 1 लाख रुपये इतका खर्च येतो. मात्र, योग्य व्यवस्थापनामुळे सर्व खर्च वजा करून त्यांना एकरी 1.50 ते 2 लाख रुपयांचा निव्वळ नफा सहज मिळतो. एकदा लागवड केल्यानंतर ढोबळी मिरचीचे उत्पादन सलग चार महिने चालू राहते, ज्यामुळे शेतकऱ्याला नियमित आणि शाश्वत उत्पन्न मिळते.
आपल्या या यशस्वी अनुभवाच्या जोरावर हणमंत तांबवी यांनी इतर बळीराजाला मोलाचा सल्ला दिला आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देऊन प्रथम आपल्या जमिनीचा नीट अभ्यास करावा. पिकांची संपूर्ण शास्त्रीय माहिती घेऊन योग्य नियोजनबद्ध शेती केल्यास शेतीतून नक्कीच उत्तम नफा मिळवता येतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. चिकमहूदच्या या शेतकऱ्याचा प्रयोग परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.