बातमी ऐका (Marathi Voice Reader)
मुंबई: ‘ऑक्टोबर हिट’च्या चटक्यांनी महाराष्ट्र हैराण झाला आहे. अशातच वाढत्या उष्णेतेचा परिणाम आता थेट रेल्वे रुळांवर देखील होत आहे. रुळांचे प्रसरण झाल्याच्या घटनेमुळं मध्य रेल्वेने परळ, दिवा आणि दिघा परिसरात आपत्कालीन ब्लॉक घेतला. या ब्लॉकमुळे दुपारच्या सत्रातील लोकल फेऱ्या सुमारे 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाल्याचे आणि लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी वाढल्याचे चित्र होते.
ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उष्णतेची लाट निर्माण झाल्याची स्थिती आहे. वाढत्या तापमानामुळे रेल्वेच्या रुळांचे प्रसरण होते. अशा स्थितीत लोकल रुळांवरून घसरण्याचा धोका निर्माण होतो. रुळांची पाहणी करणाऱ्या ट्रॅकमनकडून याबाबत सूचना मिळाल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून आपत्कालीन ब्लॉक घेण्यात येतो आणि देखभाल-दुरुस्तीची कामे केली जातात.
Weather Alert: जाता-जाता झोडपणार, मह्राराष्ट्राच्या हवामानात पुन्हा उलटफेर, आता थेट पावसाचा अलर्ट
मंगळवारी परळ स्थानक परिसरात उष्णतेमुळेच धीम्या रेल्वे मार्गावर ब्लॉक घेण्यात आला. दुपारी 12.30 ते 12.45 आणि 1.05 ते 1.25 या वेळेत घेतलेल्या ब्लॉकचा परिणाम अप आणि डाउन धीम्या मार्गावरील लोकल सेवेवर झाला. त्यामुळे लोकल फेऱ्या सुमारे 20 मिनिटे उशिराने धावत होत्या. तर ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघा स्थानक परिसरातही डाउन मार्गावर दुपारी 1.38 ते 1.53 या कालावधीत काम करण्यात आले. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गासह ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्यांना देखील उशीर झाला.
दरम्यान, वाढत्या उष्णतेनं लोकल उशिरा धावत होत्या. मात्र, मध्य रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे स्थानक आणि लोकलमध्ये देखील याबाबत पुरेश्या उद्घोषणा होत नव्हत्या. त्यामुळे प्रवाशांच्या त्रासात भर पडली. फलाटावर पोहोचल्यानंतरच प्रवाशांना लोकल उशिराने धावत असल्याचे समजले. लोकलला मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे ठाणे, मुलुंड, भांडुप, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकांवरील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.