शिबला आश्रमशाळेत वन्यजीव सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रम; वनसंपदेच्या संवर्धनाचा दिला जागर
ज्ञानेश्वर आवारी झरी जामनी
झरी जामनी तालुक्यातील शिबला येथे सामाजिक वनीकरण परीक्षेत्र उमरी अंतर्गत पांढरकवडा राष्ट्रीय हरित सेना यांच्या वतीने माध्यमिक आश्रमशाळा, शिबला येथे ५ ऑक्टोबर २०२६ रोजी वन्यजीव सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव व वनसंपदेच्या संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमातून ‘वन वाचवा, वन्यजीव वाचवा’ असा प्रभावी संदेश देण्यात आला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वनांचे पर्यावरणीय महत्त्व, वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन, जैवविविधतेचे जतन तसेच वनसंपदेचे संरक्षण याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. वन्यप्राण्यांचे अस्तित्व हे पर्यावरणीय समतोलासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, वन्यजीवांच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कु. तोष्णा बोदाडे होत्या. प्रमुख मार्गदर्शक कु. उषा बोंडे, वनरक्षक यांनी विद्यार्थ्यांना वन्यजीव संरक्षण व संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हणून मिलिंद चौधरी व नितीन इंगले सर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर येंरमे यांनी केले. सूत्रसंचालन कु. देवयानी अंबुळकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन कु. पूजा चांदेकर मॅडम यांनी केले.
वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव व पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.