बातमी ऐका (Marathi Voice Reader)
मुंबई: एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीचा फटका बसल्यानंतर आता सर्वसामान्यांना आणखी एक मोठा झटका बसला आहे. मुंबई आणि परिसरात सीएनजीच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली असून महागाईचा भडका उडाला आहे. महानगर गॅस लिमिटेडने (MGL) मुंबई आणि आसपासच्या परिसरात सीएनजीच्या दरात प्रति किलो १ रुपयाची वाढ जाहीर केली आहे. १ नोव्हेंबरपासून लागू झालेल्या या नव्या सुधारित दरानुसार मुंबईत सीएनजी आता ९० रुपये प्रति किलो या दराने मिळणार आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यांतील ही दुसरी दरवाढ आहे.
सीएनजीची दरवाढ का?
अमेरिका, इस्राईल आणि इराण यांच्यातील सुरू असलेल्या युद्ध आणि संघर्षांमुळे तेल पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला आहे. त्यामुळे इनपुट गॅस खरेदीच्या खर्चात प्रचंड वाढ झाल्याचे ‘एमजीएल’ने स्पष्ट केले आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे देशांतर्गत उत्पादित गॅस आणि आयात केलेल्या आर-एलएनजी (RLNG) च्या किमती आंतरराष्ट्रीय दरांनुसार मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. तसेच देशांतर्गत गॅसचे वाटप कमी झाल्याने कंपनीला महागड्या स्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे. खरेदीचा हा वाढीव खर्च अंशतः भरून काढण्यासाठी आणि सीएनजीचा अखंडित पुरवठा सुरू ठेवण्यासाठी ही दरवाढ करण्यात आल्याचे कंपनीने शनिवारी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
१३ लाख वाहनधारकांना फटका
या दरवाढीमुळे मुंबई महानगर क्षेत्रातील (MMR) सुमारे १२.९३ लाख वाहनचालकांना थेट फटका बसणार आहे. यामध्ये ऑटो-रिक्षा, टॅक्सी, खासगी वाहने आणि बेस्टसह विविध महापालिका व राज्य परिवहन (ST) मंडळाच्या सार्वजनिक बसचा समावेश आहे. यामुळे आगामी काळात प्रवाशांच्या भाडेवाढीचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
सीएनजीची दरवाढ किती झाली?
मे महिन्यात सीएनजी ८६ रुपये प्रति किलो तर पीएनजी (PNG) ₹५२ प्रति एससीएम इतका दर होता. सप्टेंबर महिन्यात दोन रुपयांनी वाढ होऊन सीएनजी ८८ रुपये प्रति किलो झाला. १ ऑक्टोबर रोजी एक रुपयांनी वाढ होऊन दर ८९ प्रति किलो झाला.तर, एक नोव्हेंबरपासून पुन्हा एक रुपयांची वाढ झाली असून ९० रुपये प्रति किलो झाला आहे.
पेट्रोल-डीझेल आणि सीएनजीच्या दरात किती फरक?
सततच्या दरवाढीमुळे आता सीएनजी आणि पारंपरिक इंधनांमधील (पेट्रोल/डीझेल) किमतीतील तफावत कमालीची कमी झाली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर १०० रुपयांच्या वर स्थिर असताना सीएनजी ९० रुपयांवर पोहोचल्याने सीएनजी वाहनधारकांची बचत आता मर्यादित उरली आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १११.२१ रुपये प्रति लिटर असून डीझेलचा दर हा ९७.८३ रुपये प्रति लिटर इतका झाला आहे.
दरम्यान, खरेदी खर्च कमी करण्यासाठी सर्व पर्यायांचा शोध घेतला जाईल आणि नैसर्गिक गॅस या स्वच्छ इंधनाला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न सुरूच राहतील, असे कंपनीने सांगितले.