बातमी ऐका (Marathi Voice Reader)
छत्रपती संभाजीनगर : चार महिन्यांच्या गर्भवतीने घराच्या गच्चीवरून उडी घेऊन आयुष्य संपवलं. कौटुंबिक वाद आणि चारित्र्यावर घेतल्या जाणाऱ्या संशयाला कंटाळून विवाहीतेने माहेरी असतानाच टोकाचं पाऊल उचललं. गंभीर जखमी अवस्थेत उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सोनू विनोद राठोड (वय 19) असे मृत विवाहितेचं नाव आहे. या घटनेनं दुर्दैवी घटनेनं छत्रपती संभाजीनगरात खळबळ उडाली.
विशेष म्हणजे, गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू असतानाच सोनू हिच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाला होता. विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि छळ केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी सातारा पोलिसांनी पती आणि सासूला अटक केली आहे.
दिवाळी तोंडावर, मुलीला भेटायला जात होते शिक्षक, पण नियतीच्या मनात वेगळंच, भेट अपूर्णच राहिली, संभाजीनगरमधील मन सुन्न करणारी घटना!
मिळालेल्या माहितीनुसार, सोनू हिचा 12 जून 2025 रोजी विनोद राठोड (वय 26) याच्यासोबत विवाह झाला होता. विवाहानंतर काही काळातच पती विनोद, सासू सुनीता राठोड (वय 45), दीर विशाल राठोड (वय 24), काका सुभाष राठोड (वय 45) आणि मावशी पिना राठोड (वय 38, सर्व रा. मुकुंदवाडी) हे सोनूच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याचा आरोप आहे. या संशयातून तिला वारंवार मानसिक त्रास दिला जात होता. तसेच तिच्यासोबत मारहाण करून शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असल्याचे तिच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे.
सोनू चार महिन्यांची गर्भवती होती. मात्र, गर्भवती असतानाही तिचा छळ सुरूच असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री तिचा पती विनोद तिला भेटण्यासाठी साताऱ्यातील आलोकनगर परिसरात असलेल्या तिच्या माहेरी आला होता. रात्री उशिरापर्यंत दोघांमध्ये गप्पा झाल्यानंतर मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास विनोद तेथून निघून गेला. मात्र, त्यानंतर अवघ्या तासाभरात म्हणजेच रात्री दीडच्या सुमारास तो पुन्हा सोनूच्या माहेरी परत आला.
रात्री साडेतीन ते चारच्या सुमारास सोनू आणि तिचा पती विनोद घराच्या गच्चीवर बसून बोलत होते. याचदरम्यान दोघांमध्ये जोरदार वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. काही वेळाने गच्चीवरून कोणीतरी खाली पडल्याचा मोठा आवाज झाला. आवाज ऐकताच घरातील लोकांनी बाहेर धाव घेतली. त्यावेळी सोनू घराखाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली.
सोनू हिने गच्चीवरून उडी मारल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने तिला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. घाटी रुग्णालयात सोनूवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान 27 ऑक्टोबर रोजी तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच 29 ऑक्टोबर रोजी सोनूचीही मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली. या घटनेमुळे तिच्या माहेरच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
सोनूचे वडील रमेश दासू चव्हाण (वय 40) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पती आणि सासरच्या मंडळींकडून चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार छळ, मारहाण आणि मानसिक त्रास दिला जात होता. याच छळाला कंटाळून सोनूने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या तक्रारीवरून सातारा पोलिसांनी पती विनोद राठोड, सासू सुनीता राठोड, दीर विशाल राठोड, मावसा सुभाष राठोड आणि मावशी पिना राठोड या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक शैलेश देशमुख यांनी कारवाई करत पती विनोद आणि सासू सुनीता यांना तत्काळ अटक केली, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली.