बातमी ऐका (Marathi Voice Reader)
Mugdha Deshmulkh Death News: लंडन येथे उच्चशिक्षणासाठी गेलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील एका ३४ वर्षीय तरुणीचा मृतदेह पिंपरी-चिंचवडजवळील गहुंजे येथील ‘लोढा बेलमोंडो’ या अतिशय आलिशान सोसायटीतील बंद फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे. मुग्धा अविनाश देशमुख (वय ३४) असं मृत तरुणीचं नाव असून, ती छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे निवृत्त मुख्य अभियंता अविनाश देशमुख यांची लेक होती.
लंडन सोडून गुपचूप भारतात; कुटुंबापासून लपवलं सिक्रेट
मिळालेल्या माहितीनुसार, मुग्धा देशमुख ही जुलै २०२५ मध्ये एमबीएचं शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेली होती. लंडनला गेल्यापासून ती नियमितपणे आपल्या कुटुंबीयांच्या संपर्कात होती. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी तिचं आईसोबत अखेरचं बोलणे झालं होतं. ती एका मुलाखतीसाठी जात असल्याचं आपल्या आईला सांगितलं होतं. मात्र त्यानंतर तिचा फोन बंद झाला. कुटुंबीयांचा तिच्याशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला.
मुलीशी संपर्क होत नसल्याने चिंतेत पडलेल्या कुटुंबीयांनी मुग्धाच्या लंडन येथील तिच्या मैत्रिणींशी संपर्क साधला. मुग्धाबद्दल चौकशी केली. पण तिच्या मैत्रिणींनी दिलेली माहिती ऐकून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. मुग्धाने ऑगस्ट २०२६ च्या शेवटीच लंडन सोडल्याची धक्कादायक माहिती कुटुंबांना मिळाली. दोन महिन्यांपूर्वी मुलगी लंडनवरून भारतात परतली, तरीही तिने कुटुंबाला सांगितलं नाही, आता मुलगी अचानक गायब झाल्याने घाबरलेल्या पालकांनी तातडीने छत्रपती संभाजीनगरच्या उस्मानपुरा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.
बँक व्यवहार आणि ‘फूड ॲप्स’मुळे लागला सुगावा
तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मुग्धाचा शोध घ्यायला सुरुवात केली. तिचं मोबाईल लोकेशन आणि बँक खात्यांची पाहणी करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांना आढळलं की, मुग्धाच्या क्रेडिट कार्डचा वापर भारतातील ‘झोमॅटो’, ‘स्विगी’ आणि ‘ब्लिंकिट’ यांसारख्या ऑनलाईन डिलिव्हरी ॲप्सवर सातत्याने केला जात होता. या तांत्रिक पुराव्यावरून ती परदेशात नसून भारतातच असल्याचं स्पष्ट झालं.
यानंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गहुंजे येथील ‘लोढा बेलमोंडो’ सोसायटीतील फ्लॅटचा पत्ता शोधला. इथं पोलीस गेले असता फ्लॅटचा मुख्य दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी चावी बनवणाऱ्याच्या मदतीने दरवाजा उघडला. घरात प्रवेश करताच पोलिसांना बेडरूममध्ये मुग्धा यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.
मृतदेहाजवळ आढळली औषधं
शिरगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुग्धा या ऑगस्ट महिन्यापासून या फ्लॅटमध्ये एकट्याच वास्तव्यास होत्या. त्यांनी २१ ऑक्टोबर रोजी आपल्या घरामध्ये येणाऱ्या मोलकरणीलाही काम बंद करण्यास सांगितलं होतं. मृतदेहाच्या जवळ पोलिसांना काही औषधंही आढळून आली आहेत. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचं वाटत असलं तरी पोलीस सर्व बाजुने तपास करत आहेत.
या फ्लॅटवर मुग्धा काय करत होती?
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्टच्या शेवटी भारतात परतल्यानंतर मुग्धाने हा फ्लॅट भाड्याने घेतला होता. या फ्लॅटमध्ये राहून ती ऑनलाईन क्लासेस घेत होती. त्यातून आपला खर्च भागवत होती. मात्र मुग्धासोबत लंडनमध्ये काय घडलं? ती अचानक भारतात का परतली? भारतात येऊनही तिने आपल्या कुटुंबापासून हे सिक्रेट का लपवलं? या प्रश्नांची उत्तरं अजूनही अनुत्तरित आहेत. पोलीस घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.