बातमी ऐका (Marathi Voice Reader)
नवी मुंबई : नवी मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कौटुंबिक कारणांवरून पती आणि सासऱ्याकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून घणसोलीतील एका 28 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आशा कृष्णा खराट असे मृत विवाहितेचे नाव आहे. आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर गेल्या पाच दिवसांपासून त्यांची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
नेमकी घटना काय?
मृत आशा खराट या पती कृष्णा पांडुरंग खराट (32), सासरे पांडुरंग खराट (70) आणि मुलांसह घणसोली सेक्टर 4 येथील साईराज सोसायटीत राहत होत्या. पती आणि सासरे कौटुंबिक कारणांवरून त्यांचा सतत शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचा आरोप आहे. या छळाला कंटाळून आशा यांनी 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास राहत्या घरात आत्महत्येचा प्रयत्न केला.
ही बाब लक्षात येताच त्यांना तातडीने उपचारासाठी वाशी येथील महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पाच दिवस उपचार सुरू असूनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर 6 नोव्हेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.या प्रकरणी मृत विवाहितेचा भाऊ सुरेश कचरे यांनी कोपरखैरणे पोलिसांकडे तक्रार दाखल केली.