बातमी ऐका (Marathi Voice Reader)
पुण्याच्या येरवडा परिसरातील रामनगर भागात किरकोळ वादातून एका व्यक्तीने आपल्या मित्राच्या अंगावर ॲसिडसदृश द्रवपदार्थ फेकल्याची संतापजनक घटना घडली आहे. या हल्ल्यादरम्यान झालेल्या झटापटीत बाटलीतील ॲसिडचे शंतोडे रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वार आणि त्याच्या लहान मुलीच्या अंगावर उडाल्यामुळे एका चिमुकलीसह चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी त्वरित कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली आहे.
नितीन सुंदर जाधव (वय ५२, रा. पांढूलमाण वस्ती, येरवडा) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. ही घटना ऐन दिवाळीच्या तोंडावर शुक्रवारी ६ तारखेला घडली.
नेमकी घटना कशी घडली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुमित्रा इंद्रपाल डग्ग्या (वय ५२, रा. रामनगर, येरवडा) आणि आरोपी नितीन जाधव हे दोघे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. सुमित्रा यांचा मुलगा हा नितीन जाधवचा मित्र आहे. काही दिवसांपूर्वी सुमित्रा यांच्या मुलासोबत आरोपीचा वाद झाला होता. याच जुन्या वादाचा राग मनात धरून शुक्रवारी (६ नोव्हेंबर) दुपारी चारच्या सुमारास आरोपी जाधव हा हातात ॲसिडसदृश द्रवपदार्थाची बाटली घेऊन सुमित्रा यांच्या घरासमोर आला.
तिथे त्याने सुमित्रा यांना शिवीगाळ करत तिच्या मुलाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला आणि थेट मुलाच्या अंगावर ॲसिड फेकले. हे कृत्य रोखण्यासाठी सुमित्रा यांनी आरोपीच्या हातातील बाटली ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. या झटापटीदरम्यान बाटलीतील ॲसिडचे शिंतोडे रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वारासह त्याच्या लहान मुलीच्या अंगावर उडाले. या घटनेत फिर्यादी महिलेसह तिचा मुलगा, रस्त्यावरून जाणारा दुचाकीस्वार आणि त्याची लहान मुलगी असे एकूण चौघेजण जखमी झाले. या सर्वांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून आरोपी जेरबंद
घटनेची गंभीर दखल घेत येरवडा पोलिसांनी तातडीने सुमित्रा डग्ग्या यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी नितीन सुंदर जाधव याला अटक केली असून, गंभीर दुखापत केल्याप्रकरणी त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या थरारक घटनेमुळे येरवडा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.