बातमी ऐका (Marathi Voice Reader)
सोलापूर : राज्यात आणि विशेषतः सोलापूर जिल्ह्यात यंदा पडलेल्या तीव्र दुष्काळामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. शेती आणि पशुसंवर्धन व्यवसाय संकटात सापडला असून, याचा सर्वाधिक वाईट परिणाम मेंढपाळांवर झाला आहे. जनावरांच्या दावणीला चारा आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या सांगोला बाजारात मेंढीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. एकेकाळी 50 ते 60 हजार रुपयांपर्यंत विकली जाणारी उच्च प्रतीची मेंढे आज अवघ्या 20 ते 25 हजार रुपयांवर आली आहेत. यामुळे मेंढपाळ आर्थिक संकटात सापडले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला बाजार हा राज्यभरात जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी प्रमुख बाजार म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याशिवाय सांगली, सातारा, पुणे, आणि कर्नाटकसह इतर विविध भागांतील व्यापारी तसेच शेतकरी जनावरांची खरेदी आणि विक्री करण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात. मात्र, यंदाच्या दुष्काळामुळे या बाजारपेठेचे चित्र पूर्णपणे बदलले आहे.
पावसाच्या लहरीपणामुळे आणि पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याची प्रचंड टंचाई निर्माण झाल्यामुळे मेंढपाळांना आपल्या पाळीव जनावरांचे संगोपन करणे अत्यंत कठीण झाले आहे. चाऱ्याचे वाढलेले दर आणि पाण्याची अनुपलब्धता यामुळे मेंढपाळांना नाइलाजास्तव आपली महागडी मेंढे कवडीमोल भावाने विकावी लागत आहेत. 50 ते 60 हजार रुपये किमतीची मेंढे अर्ध्याहून कमी किमतीत म्हणजेच 20 ते 25 हजार रुपयांना विकण्याची नामुष्की मेंढपाळांवर ओढवली आहे.
या बिकट परिस्थितीबद्दल अधिक माहिती देताना मेंढपाळ बांधव बाळासो व्हनमाने यांनी सांगितले की, दुष्काळामुळे आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वर्षानुवर्षे जीवापाड जपलेली जनावरे आज कवडीमोल भावाने विकावी लागत आहेत. चाऱ्याचा खर्च भागवणे अशक्य झाल्यामुळे जनावरे जगवायची कशी, हा मोठा प्रश्न आमच्यासमोर उभा ठाकला आहे.
या गंभीर परिस्थितीमुळे मेंढपाळ वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. शासनाने तातडीने दुष्काळग्रस्त भागातील मेंढपाळांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात आणि आर्थिक मदत जाहीर करावी, अशी आर्त हाक या निमित्ताने दिली जात आहे. शासनाकडून योग्य वेळी मदत न मिळाल्यास हा पारंपरिक व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त होत आहे.