बातमी ऐका (Marathi Voice Reader)
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाचे गडद सावट पसरलेले असतानाच, मोहोळ तालुक्यातील आष्टी गावात एक दुर्देवी घटना घडली आहे. वीज तारा तुटल्यामुळे लागलेल्या भीषण आगीत शेतकऱ्याने पोटच्या लेकरासारखा जपलेला चार एकर ऊस जळून खाक झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे शेतकरी बाळासाहेब शामराव पाटील यांचे तब्बल तीन ते चार लाखांचे आर्थिक नुकसान झाले असून, दुष्काळात तेरावा महिना अशीच परिस्थिती या संकटामुळे झाली आहे.
नेमकी घटना कशी घडली?
आष्टी येथील शेतकरी बाळासाहेब शामराव पाटील यांनी दुष्काळाचे संकट डोळ्यांसमोर असतानाही अत्यंत मेहनतीने आणि जिद्दीने चार एकर क्षेत्रावर उसाची लागवड केली होती. उपलब्ध पाण्याचा ताळेबंद सांभाळून त्यांनी उसाचे पीक जोमात आणले होते. मात्र, ऐन दिवाळीत शेतातून गेलेली विजेची तार अचानक तुटून पडली. त्यामुळे उसात ठिणगी पडून भीषण आग लागली. पाहता पाहता या आगीने संपूर्ण चार एकर उसाला आगीने घेरले.
अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
या भीषण आगीत केवळ उसाचेच नव्हे, तर शेतातील केबल, पाण्याची पाईपलाईन आणि ठिबक सिंचन यंत्रणाही पूर्णपणे जळून खाक झाली आहे. विशेष म्हणजे, या एकाच दुर्घटनेत केवळ बाळासाहेब पाटीलच नव्हे, तर परिसरातील जवळपास 30 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. उसाच्या लागवडीसाठी आणि मशागतीसाठी बाळासाहेब पाटील यांना आतापर्यंत सुमारे दोन लाखांपर्यंतचा खर्च आला होता. ऐन पिकाच्या काढणीच्या वेळेस आणि दिवाळी सणाला उभा पिकलेला ऊस डोळ्यांसमोर खाक झाल्याने पाटील कुटुंब तीव्र मानसिक धक्क्यात आहे.
अग्निशामक दलाची आणि प्रशासनाची कारवाई
आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी तात्काळ धावपळ करत अग्निशामक दलाला फोन करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेत पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले आणि आग पूर्णपणे विझवली, परंतु तोपर्यंत उसाचे अतोनात नुकसान झाले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक तलाठ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ पंचनामा केला आहे.
दिवाळी कशी साजरी करावी?
एकीकडे दुष्काळाची भीषण परिस्थिती आणि दुसरीकडे विजेचे तार तुटून पडल्याने झालेले लाखो रुपयांचे नुकसान, यामुळे शेतकरी बाळासाहेब पाटील यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा आणि कुटुंबाला आधार देण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवाळी सण आला असताना हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. अशा परिस्थितीत नुकसान भरपाई कधी मिळणार आणि दिवाळी साजरी कशी करावी? असा गहिवरलेला सवाल शेतकरी बाळासाहेब पाटील यांनी उपस्थित केला आहे. शासनाने तातडीने या नुकसानीची दखल घेऊन योग्य ती आर्थिक मदत द्यावी, अशी आर्त हाक आष्टीतील त्रस्त शेतकऱ्यांकडून दिली जात आहे.